Monday 16 September 2013

खाशाबांचा वारसा


स्वातंत्र्यानंतर भारताला ऑलिंपिक स्पर्धांमध्ये पहिले वैयक्तिक पदक एका
मराठी मल्लामुळे मिळाले. खाशाबा जाधव यांनी १९५२ च्या हेलसिंकी ऑलिंपिक
स्पर्धेमध्ये कांस्यपदक मिळविले होते. सातारा जिल्ह्यातील कराड
शहराजवळच्या एका खेड्यात खाशाबा जाधव आपल्या पहिलवान वडिलांच्या
मार्गदर्शनाखाली कुस्ती शिकले. ऑलिंपिकमधील कुस्ती स्पर्धेत सहभागी
होण्यासाठी त्यांना प्रतिकूल आर्थिक स्थितीचा सामना करावा लागला. योग्य
प्रशिक्षण नाही, आर्थिक पाठबळ नाही अशा स्थितीतही त्यांनी १९५२ साली
ऑलिंपिकमध्ये कुस्तीतील कांस्यपदक मिळवले. अनेक दशके हे पदक म्हणजे
ऑलिंपिकमधील भारताचे एकमेव वैयक्तिक पदक होते. खाशाबांच्या नंतर १९९६
साली लिअँडर पेसने टेनिस या खेळात ऑलिंपिकमध्ये कांस्यपदक मिळवले.

एका पराक्रमी मराठी मल्लाची आठवण करण्याचे कारणही तसेच घडले आहे.
आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने ऑलिंपिकमध्ये कुस्तीचा समावेश कायम
ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे खाशाबांप्रमाणे कुस्तीमध्ये
ऑलिंपिक पदक मिळवण्यासाठी प्रयत्न करणार्‍या भारतातील अनेक मल्लांना
दिलासा मिळाला. मी या निर्णयाचे मनापासून स्वागत करतो.

गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने २०१६ च्या ऑलिंपिक
स्पर्धेनंतर कुस्ती हा खेळ ऑलिंपिक स्पर्धांमध्ये बंद करण्याचा निर्णय
घेतला होता. या निर्णयाची जगभर जोरदार प्रतिक्रिया उमटली. ऑलिंपिक
स्पर्धांमध्ये भारताला मिळणार्‍या पदकांमध्ये कुस्तीचा वाटा महत्त्वाचा
आहे. ऑलिंपिक स्पर्धांमधून कुस्ती वगळणार या निर्णयामुळे खळबळ उडणे
स्वाभाविक होते. अनेक मल्लांना भवितव्य अंध:कारमय झाल्याचे वाटले. अशा
स्थितीत आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने २०१६ नंतर २०२० साली जपानमधील
टोकियो येथे होणार्‍या ऑलिंपिक स्पर्धेत तसेच २०२४ च्या स्पर्धेत कुस्ती
या खेळाचा समावेश कायम ठेवायचा निर्णय बहुमताने घेतला, अशी बातमी
प्रसिद्ध झाली आहे.

कुस्ती हा जगातील प्राचीन खेळ आहे. आधुनिक काळातील ऑलिंपिक स्पर्धांमध्ये
स्वाभाविकपणे कुस्तीचा समावेश केला गेला. पण या खेळाचा मंदावलेला वेग,
नक्की काय निकाल लागला हे प्रेक्षकांना समजणे अवघड होणे आणि कुस्तीच्या
बाबतीतील स्त्री – पुरुष असमानता या कारणांमुळे या खेळाने ऑलिंपिकच्या
अधिकार्‍यांची नाराजी ओढवून घेतली.

ऑलिंपिक स्पर्धांमधून कुस्तीला वगळण्याचा निर्णय झाल्यानंतर जागतिक
पातळीवरील कुस्तीची नियामक संस्था खडबडून जागी झाली. कुस्तीसाठीचे
पुरुषांसाठीचे दोन वजनी गट रद्द करून महिलांसाठीचे दोन गट वाढविण्यात
आले. तसेच कुस्ती वेगवान होण्यासाठी नियमात बदल केले. अखेर ऑलिंपिकमध्ये
कुस्तीचा समावेश कायम ठेवायचा निर्णय झाला.
भारतामध्ये कुस्तीची प्राचीन काळापासून परंपरा आहे. गावोगावी कुस्त्यांचे
फड पहायला आजही गर्दी होते. कोल्हापूर हे तर कुस्तीचे विद्यापीठच. तेथील
तालमींमध्ये अनेक तरुण वस्तादांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे डाव
शिकतात. विद्येचे माहेरघर म्हणून पुणे शहराची ओळख आहे. पुण्यातही अनेक
तालमी असून त्यामध्ये बहुजन समाजाचे तरुण कुस्तीचे प्रशिक्षण घेत असतात.

ऑलिंपिक स्पर्धांमध्ये कुस्ती हा आपल्या देशाचा भरवशाचा खेळ ठरला आहे.
ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भारताला मिळालेल्या वैयक्तिक पदकांची सुरुवात
खाशाबा जाधवांनी कुस्तीचे पदक जिंकून केली. अलिकडच्या काळातही
ऑलिंपिकमधील भारताच्या यशात कुस्तीचा वाटा महत्त्वाचा असतो. सुशीलकुमार
या दिल्लीच्या पहिलवानाला २००८ व २०१२ या सलग दोन ऑलिंपिक स्पर्धांमध्ये
पदके मिळाली आहेत. कुस्तीच्या क्षेत्रात भारतीय पहिलवान चांगली कामगिरी
करू लागले असतानाच या खेळाच्या ऑलिंपिकमधील समावेशाला खीळ बसली होती. आता
ऑलिंपिकमध्ये कुस्ती कायम राहणार असल्याचा निर्णय झाल्यामुळे दिलासा
मिळाला आहे.

नव्या पिढीने खाशाबांच्या कार्यापासून प्रेरणा घेण्याची गरज आहे.
त्यांच्या वेळी होती तशी प्रतिकूल परिस्थिती आता नाही. ऑलिंपिकमधील
कुस्तीचा समावेशही कायम राहिला आहे. ऑलिंपिकच्या कुस्तीस्पर्धेत यश
मिळवण्यासाठी भारतीय मल्लांना नव्याने संधी निर्माण झाली आहे.

No comments:

Post a Comment