Friday 21 December 2012


गुड गव्हर्नन्स ः एक सामूहिक जबाबदारी
नागपूरचे विधानभवन
आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आणि राज्यघटना अस्तित्वात आल्यापासून गेल्या ५०-६० वर्षांत प्रगतीचे अनेक टप्पे आपण पार पाडले आहेत. आपला देश विकसित झाला नसला तरी विकसनशील आहे. जगातील बलवान राष्ट्रांत भारताचा समावेश होतो. या सर्व समाधानकारक बाबी असल्या तरी या देशातील सर्वसामान्य व्यक्तींच्या आशा-आकांक्षा आहेत. त्या पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून एक सामाजिक परिवर्तन करणे आवश्यक आहे. अजूनही आर्थिक, सामाजिक असमतोल आहे. आपली अर्थव्यवस्था सध्या नाजूक स्थितीत आहे. आपला विकास दर ९ टक्के होता, तो आता ५.३० टक्क्यांपर्यंत आलेला आहे. हा दर खाली आला असला तरी बाकीच्या देशांसमोर जेवढ्या समस्या आहेत तेवढ्या समस्या आज आपल्यासमोर नाहीत. म्हणूनच या देशामध्ये गुंतवणुकीसाठी परदेशस्थ लोक किंवा उद्योगपती, शेती, शिक्षण व इतर क्षेत्रांत आपल्या देशाला सर्वोत्तम पर्याय मानतात.

या पार्श्‍वभूमीवर राज्यकर्ते म्हणून आमचे काम कसे चालले आहे? विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पहिल्या आठवड्यात सभागृहाचे कामकाज चाललेच नाही. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला असं वाटणं अत्यंत स्वाभाविक आहे, की हे सभागृह किंवा हे लोकप्रतिनिधी जनतेचा वेळ आणि पैसा नाहक खर्च करीत आहेत. त्यांना कामकाज करावयाचं नाही. त्यामुळे राजकारण म्हणजे काही तरी भयंकर आहे. तो आपला प्रांत नाही, अशी भावना निर्माण होऊ शकते. तसा गैरसमज कृपया कुणीही करून घेऊ नये. सरकार म्हणजे फक्त निवडून आलेले लोकप्रतिनिधी नाहीत. सरकारमध्ये वेगवेगळ्या स्तरांवर काम करणारे अधिकारी असतात. सनदी अधिकारी असतात. आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. केंद्र सरकारची एखादी प्रभावी योजना गावात राबवायची असेल तर आता सर्व अधिकार ग्रामपंचायतीला अथवा ग्रामसभेला दिले आहेत. लोकशाहीमध्ये एकच पर्याय नसतो. अनेक पर्याय असतात. त्यामुळे लोकांना भरपूर संधी असते. या ठिकाणी सत्ताबदल कमी-जास्त प्रमाणात होतो. त्यामुळे आपली लोकशाही प्रगल्भ झालेली आहे. पण आगामी काळात जो ‘सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट’ या न्यायानुसार सक्षम आहे तोच टिकेल. ज्याची विचारधारा, प्रशासन सक्षम आहे तोच पक्ष, तोच नेता, तोच सदस्य या स्पर्धेत टिकेल. त्यातून सुप्रशासन (गुड गव्हर्नन्स) तयार होईल. याचा अर्थ पंतप्रधान, मुख्यमंत्रीच नव्हे तर अगदी जिल्हा परिषद, पंचायत समिती अन् ग्रामपंचायतीच्या कर्मचार्‍यांवरही चांगल्या वर्तणुकीची जबाबदारी आहे. अशा या साखळीच्या माध्यमातून सरकार तयार होते. तरीही राज्यकर्ते जोपर्यंत पारदर्शक कारभार करीत नाहीत तोपर्यंत जनतेचा आमच्यावर विश्‍वास बसणार नाही. हा पारदर्शकपणा राज्यकर्त्यांनी आपल्या कार्यशैलीत आणण्याची गरज आहे. 

कदाचित हे दुष्टचक्र ‘कोंबडी आधी की अंडे’ आधी या प्रश्‍नाप्रमाणे आहे. आधी मतदारांनी जबाबदारीनं वागायचं की लोकप्रतिनिधींनी जबाबदारीनं वागायचं किंवा आधी लोकप्रतिनिधींनी जबाबदारीनं वागायचं नंतर मतदारांनी जबाबदारीनं वागायचं. मतदार तसं वागतात म्हणून आम्ही असे वागतो की आम्ही तसं वागतो म्हणून मतदार तसे वागतात, असा हा गहन प्रश्‍न आहे. प्रत्येकानं आपली जबाबदारी स्वीकारली पाहिजे म्हणजे हा प्रश्‍न सुटेल व आपली लोकशीही अधिक परिपक्व होईल. प्रसिद्धीमाध्यमांचीही भूमिका यात महत्त्वाची आहे. विधानसभेत एखादा सदस्य प्रभावीपणे बोलला तर माध्यमे त्याला प्रसिद्धी देत नाहीत. परंतु एखादा सदस्य व्यासपीठावर आला अन् त्याने राजदंड पळवून नेला, किंवा एखाद्या सदस्याने कागद फाडून भिरकावले तर वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर त्याला ठळक प्रसिद्धी मिळते. वृत्तवाहिन्यांसाठी ती ‘ब्रेकिंग न्यूज’ ठरते. अशी कृती करण्यामध्ये संबंधित सदस्याचे कोणते कर्तृत्व असते? परंतु अशा गोष्टींना प्राधान्य दिले जात असल्याने कदाचित लोकप्रतिनिधी असे वागत असतील. एखाद्या सदस्याने दिवसभर ग्रंथालयात बसून माहिती घेऊन दुसर्‍या दिवशी तासभर भाषण केले तर ‘अमूक सदस्याने चर्चेत सहभाग घेतला’ एवढीच ओळ टीव्हीवर येते. किवा वृत्तपत्रांत छापून येते. मी काय बोललो याला प्रसिद्धी मिळतच नाही. जर अशी उपेक्षा वारंवार होत असेल तर संबंधित सदस्य कशाला अभ्यासपूर्ण भाषणासाठी मेहनत करेल?  सभागृहात रंगीबेरंगी कपडे किंवा विचित्र टोपी घालून आले की मला अशा सोप्या मार्गाने भरपूर प्रसिद्धी मिळते हे त्याच्या लक्षात येईल अन् तोही तोच मार्ग अवलंबेल. या त्रुटी दूर करण्याचे काम जसे प्रसिद्धीमाध्यमांना करावे लागेल तसेच फक्त माध्यमांना दोष न देता लोकप्रतिनिधींनाही आपल्या कार्यशैलीतल्या त्रुटी दूर करण्याचे काम करावेच लागेल. 

लोकशाही व्यवस्थेत संसद, विधानमंडळ या अतिशय महत्त्वाच्या सार्वभौम संस्था आहेत. न्यायव्यवस्थेचे सार्वभौमत्व त्यांच्या ठिकाणी, सरकारचे सार्वभौमत्व सरकारच्या ठिकाणी आणि यांच्या समन्वयातून सुप्रशासन (गुड गव्हर्नन्स) बनतो. त्यातून जनहिताचे प्रश्‍न सुटण्यास मदत होते. त्यातून प्रगत राष्ट्र बनते. त्यातून एक संस्कृती बनते. त्यातून सर्वांनाच गुणवत्तापूर्ण जीवनशैली मिळते. नुसतं जगणं महत्त्वाचं नाही तर सर्वांनीच दर्जेदार जगणं महत्त्वाचं आहे. भारताची तुलना अमेरिका, युरोप किंवा इंग्लंडशी नाही. आज भारताची स्पर्धा एकाच देशाशी म्हणजे चीनशी आहे. कारण चीन आणि आपली लोकसंख्या सारखीच आहे. आज संपूर्ण जगाची बाजारपेठ काबीज करण्यासाठी चीनसारखे राष्ट्र सरसावलं आहे. आपण आपल्या गावात कोणत्याही दुकानात गेला अगदी खेळण्याच्या दुकानांत गेलो तरी तेथील खेळणी ‘मेड इन चायना’ असल्याचे आपल्या लक्षात येईल. आमच्या देशात निरक्षरतेचे प्रमाण प्रचंड आहे. अज्ञान, बेरोजगारी एका बाजूला आणि दुसर्‍या बाजूला आपले तरुण जगात महत्त्वाच्या जागा काबीज करीत आहेत. हे विरोधाभासी चित्र असले तरी जागतिक बाजारपेठ आपल्या देशासाठी सुसंधी आहे, असं मानून जर या देशाची राज्यव्यवस्था चालली आपली प्रगती नक्की होईल.  

Wednesday 12 December 2012


आदरणीय ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त...


                              बहुआयामी कर्तृत्ववान नेतृत्व


देशातील सध्याच्या मोजक्या कर्तृत्ववान नेत्यांत आदरणीय शरदचंद्र पवारसाहेबांचा समावेश होतो. गेली ४५ ते ५० वर्षे महाराष्ट्राचे राजकारण मोजक्याच नावांभोवती फिरताना आपल्याला दिसून येतं. ती नावं म्हणजे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण, राज्याच्या कृषी-औद्योगिक क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आदरणीय शरदचंद्र पवार. या नेत्यांचा महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठा प्रभाव पडला आहे. यशवंतराव चव्हाणसाहेबांचे हे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. पवारसाहेब हे त्यांचे खरे राजकीय वारसदार. पवारसाहेबांसारख्या नेत्याला घडवण्याचं श्रेय चव्हाणसाहेबांना जातं. या दोन्ही नेत्यांमध्ये अनेक साम्यस्थळं आढळतात. प्रचंड लोकसंग्रह, साधी राहणी, द्रष्टेपण, माणसाची अचूक पारख, उत्तम प्रशासन हे या दोन्ही नेत्यांचं वैशिष्ट्य. 


महाराष्ट्रात पुरोगामित्वाची परंपरा रुजवून देशाला आदर्श ठरणार्‍या कल्पक योजना, प्रकल्प राबवून चव्हाणसाहेबांनी आणि पवारसाहेबांनी महाराष्ट्राला सतत अग्रेसर ठेवलं. राजकीय अथवा वैयक्तिक जीवनात कितीही झंझावात आले तरी पवारसाहेबांनी धीरानं पावलं टाकली. आपला संयम कधीच ढळू दिला नाही. आज-काल आपल्या समाजाच्या जाणिवा बोथट झाल्या आहेत. राजकारणात सभ्यता आणि सुसंस्कृतपणा या गोष्टी हद्दपार होतील की काय, अशी भीती वाटू लागली आहे. तात्पुरत्या यशात या दोन्ही गोष्टी टिकवून ठेवणं भल्या भल्यांसाठी अशक्य झालं आहे. यशापयशाच्या पलीकडे शाश्‍वत असते ती सभ्यता. यशवंतराव चव्हाणसाहेब अशा सभ्य आणि सुसंस्कृत राजकारणातील मानदंड होते. पवारसाहेबांनीही ही मर्यादा कायम राखून चव्हाणसाहेबांचा वारसा खर्‍या अर्थानं पुढं चालवला आहे. 

पवारसाहेबांसारख्या नेत्याला घडविण्याचं श्रेय चव्हाण साहेबांना जातं. या दोन्ही नेत्यांमध्ये अनेक साम्यस्थळं आढळतात. प्रचंड लोकसंग्रह, साधी राहणी, द्रष्टेपण, माणसाची अचूक पारख, उत्तम प्रशासन हे या दोन्ही नेत्यांचं वैशिष्ट्य. त्यांचा स्वीय सहायक म्हणून काम करताना मला दीर्घ काळ त्यांचा सहवास लाभला. त्यांची कार्यशैली अभ्यासण्याची संधी मिळाली. मोजकंबोलणं, प्रश्‍नांचा अभ्यास करणं, भरपूर वाचन करणं अन् सर्व प्रकारच्या संकटांना धैर्यानं समोरं जाणं, असे पवारसाहेबांचे अनेक गुण सांगता येतील. माझ्या आगामी राजकीय वाटचालीत मला त्यातून बरंच शिकता आलं.

पवारसाहेबांनी अक्षरशः डोंगराएवढं काम उभं केलंय. न थकता सतत अठरा-वीस तास काम करण्याची त्यांची क्षमता अन्य कुठल्याही नेत्याकडं नाही. झटपट निर्णय आणि तडकाफडकी काम हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. केवळ राजकारणच नाही तर समाजकारण करणारा नेता अशीही पवारसाहेबांची ओळख  आहे. पवारसाहेबांनी काही धाडसी पुरोगामी निर्णय घेतले. राज्याच्या कल्याणासाठी काय उपयोगाचे आहे, हा धोरणीपणा त्यामागे होता. याबाबतीत मराठवाडा विद्यापीठ नामांतर, एन्रॉन वीज प्रकल्पाबाबत त्यांनी घेतलेले निर्णय ही मोठी उदाहरणं आहेत. महाराष्ट्रात पुरोगामित्वाची परंपरा रुजवण्यात पवारसाहेबांनी फार महत्त्वाची भूमिका बजावली आहे.  शेतकरीहितासाठी तर ते कायमच झटत असतात. केंद्रीय कृषिमंत्रिपदाची जबाबादारी सांभाळताना त्यांनी कायमच शेतकर्‍यांच्या कल्याणार्थ पावलं उचलली. त्यांच्या पुढाकारामुळे ७१ हजार कोटींचा कर्जमाफी योजना राबविण्यात आली. त्याचा मोठा फायदा शेतकर्‍यांना मिळाला. राज्यातील फळबागक्रांतीचे जनक म्हणूनही त्यांना ओळखलं जातं. राज्यातील औद्योगिकरणाला त्यांनी गती दिली. क्रीडाक्षेत्राच्या विकासासाठीही पवारसाहेबांनी मोठं योगदान दिलंय. राज्याच्या क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी देशी खेळांना त्यांनी प्रोत्साहन दिलं. 

महाराष्ट्रात पुरोगामित्वाची परंपरा रुजवून देशाला आदर्श ठरणार्‍या कल्पक योजना, प्रकल्प राबवून त्यांनी महाराष्ट्राला सतत अगेसर ठेवलं. राजकीय अथवा वैयक्तिक जीवनात कितीही झंझावात आले तरी पवारसाहेबांनी धीरानं पावलं टाकली. आपला संयम कधीच ढळू दिला नाही. अशा या बहुआयामी कर्तृत्ववान पवारसाहेबांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त माझ्या अंतःकरणपूर्वक शुभेच्छा!






Tuesday 11 December 2012


                     नागपूर विधिमंडळ अधिवेशनानिमित्त...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरला सुरू झाले आहे. त्यानिमित्त ... 

संयुक्त  महाराष्ट्र निर्माण झाला तेव्हा  मराठवाड्यासह विदर्भ महाराष्ट्रात समाविष्ट झाला. त्यावेळी नागपूर करार करण्यात आला. त्या करारातील तरतुदीप्रमाणे नागपूर अधिवेशन घेतलं जावं असं ठरलं. या अधिवेशनाच्या निमित्तानं विदर्भातील प्रश्‍न मार्गी लागावेत, ही अपेक्षा त्या काळात होती अन् आजही आहे. या करारानुसार हे अधिवेशन सहा आठवडे व्हावं, अशी तरतूद आहे. परंतु एखादा अपवाद वगळता नागपूर अधिवेशनाचा काळ कमी होत चालला आहे, हे मान्य केलं पाहिजे. विधिमंडळ अधिवेशनाचा कार्यकाळ राज्यपालांनी केलेल्या शिफारशींनुसार निश्‍चित होत असतो. तो वाढविण्यासाठी सत्तारूढ आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांनी एकत्र येऊन त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. 

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात निव्वळ गोंधळच होतो, असं नाही. तर काही चांगल्या मुद्द्यांवरही चर्चा होते. मात्र, सभागृहात होत असलेल्या चांगल्या चर्चेऐवजी सभागृहात अथवा सभागृहाबाहेर घातलेल्या गोंधळाला अधिक प्रसिद्धी मिळत असल्यामुळे मग चर्चेऐवजी गोंधळाचा पर्याय निवडला जातो. काही वेळा गोंधळ घालण्याची सदस्यांची इच्छा नसते. पण त्यांच्या पक्षांच्या भूमिकेमुळे ते बांधील असतात. त्यामुळे त्याचा पक्षपातळीवर विचार होऊन चर्चेवर भर देण्याचा प्रयत्न झाल्यास ही स्थिती बदलू शकते. एखाद्या मागणीसाठी रस्त्यावर येऊन आंदोलन करण्याची प्रवृत्ती वाढल्यानं घटनात्मक दर्जा असलेल्या संस्था कमकुवत होत असल्याचा भास होत असला तरीही या देशाच्या लोकशाहीनं असे अनेक हल्ले यशस्वीपणे परतवून लावले आहेत. गेल्या दोन अधिवेशनांचा माझा अनुभव असा आहे, की या स्थितीत उत्तरोत्तर सुधारणा होत आहे. सन्मानीय  विधिमंडळ सदस्य आता अधिक जबाबदारीनं वागत आहेत. चर्चेद्वारे प्रश्‍न सोडवावेत, यावर त्यांचा भर वाढला आहे, ही स्वागतार्ह बाब आहे. विधानसभेचे अधिवेशन विदर्भात होत असताना सन्माननीय सदस्यांनी विदर्भाच्या प्रश्‍नांना अधिक न्याय द्यायला हवा. त्या संदर्भात सभागृहात अधिक गांभीर्यानं चर्चा व्हावी. सरकारनंही गांभीर्यानं आपली भूमिका स्पष्ट करावी. विदर्भातील अधिवेशन ही औपचारिकता ठरू नये. विधायक निर्णय घेणारं, असं हे लक्षणीय अधिवेशन व्हावं.

विधानसभा किंवा विधान परिषदेत पक्षीय अभिनिवेशातून चर्चा होते. पण पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून राज्याच्या विकासाचा व्यापक उद्देश डोळ्यांसमोर ठेवून सांगोपांग चर्चा करण्याची गरज आहे. काही लोकप्रतिनिधींना कामकाजाची, तसेच केंद्र-राज्य सरकारच्या योजनांची माहितीच नसल्यामुळे प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. तरीही सभागृहातील कामकाजात किती सहभाग घेतला, हाच फक्त एखाद्या लोकप्रतिनिधीच्या मूल्यमापनाचा मापदंड होऊ शकत नाही. सभागृहात जे सदस्य बोलत नाहीत, ते शासनाच्या विविध समित्यांवर उत्तमरित्या अन् प्रभावीपणे काम करत असतात. नियोजन समित्यांमध्ये त्यांचे योगदान असते. आपल्या मतदारसंघात विविध योजनांचा लाभ पोचवून तसेच विविध विकासकामे हे लोकप्रतिनिधी करत असतात. त्यांचा जनसंपर्क दांडगा असतो. त्यामुळे एखाद्या लोकप्रतिनिधीचं मूल्यमापन त्याच्या या योगदानातून केलं जावं. 

जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महापालिका, नगरपालिका यांच्या अखत्यारीतील प्रश्‍न विधिमंडळ सभागृहात उपस्थित करण्यात येतात. या संस्थांना स्वायतत्ता दिली आहे. त्यावर चर्चेचा अधिकार सभागृहाला निश्‍चित आहे. पण त्यातच सभागृहाच्या कामकाजाचा वेळ बहुत करून जातो. विधिमंडळात संपूर्ण राज्यासाठीच्या धोरणांवर अधिक चर्चा व्हावी, असं अपेक्षित आहे. विधिमंडळाच्या कामकाजातील ‘फ्लोअर मॅनेजमेंट’, ‘टाईम मॅनेजमेंट’ आणि ‘सबजेक्ट मॅनेजमेंट’ अचूक असायला हवं. सर्व पक्षातील नेत्यांनी, सदस्यांनी विषय निश्‍चित करून, वाटून घेऊन त्यावर सभागृहात चर्चा घडवून आणावी. जुन्या सदस्यांनी नव्या सदस्यांनाही वाव द्यावा. जुने आणि नवे सदस्य यांच्यात समन्वय ठेवल्यास, हे नक्कीच शक्य होईल. त्यामुळे संबंधित विषयांवर सरकारचं लक्ष प्रभावीपणे वेधलं जाईल. एकूण चांगला परिणाम  साधता येईल. अर्थातच हा विषय संबंधित पक्षांच्या अधिकारातील आहे. पण एवढी किमान अपेक्षा त्यांच्याकडून ठेवल्यास ते चुकीचं ठरणार नाही.
---------------------------------------------------------------