Wednesday 30 January 2013


मंचरच्या विकासाची मानचिन्हे

वास्तविक पाहता आंबेगाव मंचर परिसर हा दुष्काळी भाग होता. १९९० मध्ये आंबेगाव-मंचर परिसराच्या लोकप्रतिनिधित्वाची जबाबदारी जनतेने जेव्हा माझ्यावर सोपवली तेव्हा पाणी प्रश्‍न मार्गी लावण्याचे ठरवले. पाणी हा शेतीचा आत्मा आहे. पाण्याशिवाय शेती व शेतीशिवाय शेतकरी जगू शकणार नाही, ही बाब समोर ठेवत त्यांनी प्रथम सिंचन जाळे प्रकल्प उभारण्याकडे विशेष लक्ष दिले. याचा पहिला टप्पा म्हणजे कुकडी प्रकल्पांतर्गत घोड नदीवर डिंभे धरणाची उभारणी केली.   
             
फक्त धरणाने हा प्रश्‍न सुटणार नव्हता.  त्यामुळे घोड नदीवर २० बंधारे व डिंभे धरणावर आठ बंधारे बांधले तसेच उपसा सिंचन योजनाही राबवल्या. यथावकाश या अवर्षणप्रवण भागाचा कायापालट होऊ लागला.  तालुक्यात पावसाची सरासरी ८६० मिमी असली तरी पाऊस पडण्यात सातत्य नसल्यामुळे पिकांचे बरेच नुकसान होत असे. या अवर्षणप्रवण परिस्थितीचा सामना आपल्या गावातील शेतकर्‍यांना करता यावा या हेतूने परिसरात सिंचन प्रकल्पांचे जाळे उभारण्याचा संकल्प करून तो सिद्धीस नेला. आधी या भागात ज्वारी, बाजरी, मटकी, गहू, हरभरा यासारखी पिके घेतली जात असत. परंतु सिंचन योजनांमुळे ऊस, टॉमॅटो, बटाटा या नगदी पिकांबरोबरच आंबा, द्राक्ष, सीताफळ यासारख्या फळांचेही उत्पादन घेतले जाते. तसेच या सिंचन प्रकल्पामुळे शेतकर्‍यांना जरबेरा, कार्नेशीम व गुलाब यासारख्या फुलांचे उत्पादन घेणे शक्य होत आहे. शेतकर्‍यांच्या शेतात फुललेल्या या फुलांना आज परदेशातही मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.

पाणी प्रश्‍न सुटल्याने आपोआपच गावातील शेतीचा प्रश्‍न सुटला आणि त्याचबरोबर शेतीसोबतच्या दुग्धव्यवसाय, कुकुटपालन, रेशीम उद्योगांनाही चालना मिळाली. शेतीला पुरेसे असे पाणी मिळाल्याने जनावरांना मुबलक चारा मिळू लागला. त्यामुळे दुग्धव्यवसायात वाढ झाली. १९९० च्या सुमारास आंबेगाव तालुक्यत पाण़ी व चार्‍याअभावी जेमतेम १८ ते १९ हजार लिटर दुधाचे संकलन होत असे. परंतु सिंचन क्षेत्रात वाढ झाल्यामुळे जनावरांना मुबलक चारा मिळाल्यानेे येथील दुग्धव्यवसायही भरभराटीला आला आहे. आता सुमारे सहा लाख लिटर दुधाचे संकलन केले जाते.

नालंदा इंग्लिश मिडियम स्कूल

देशाची प्रगती ही शेतीवर जितकी अवलंबून असते तितकाच तो शिक्षणावरही अवलंबून असतो. ग्रामीण भागातील प्रत्येक मुला-मुलीला उत्तम प्रकारचे इंग्रजी माध्यमातील शिक्षण मिळावे यासाठी नालंदा इंग्लिश स्कूलची सुरवात करण्यात आली. नालंदा इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये नर्सरीपासून दहावीपर्यंत शिक्षण दिले जाते. मराठी, हिंदी, इंग्रजीसह संस्कृत व फ्रेंच या भाषेचेही शिक्षण दिले जाते. अद्ययावत अशा या शाळेत डिजिटल स्वरुपाचे वर्ग मुलांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अभ्यासाप्रमाणे मुलांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करत योगा, मल्लखांब, नृत्य, नाटक, फुटबॉल, स्केटिंग, कराटे अशा विविध खेळांचेही प्रशिक्षण शाळेत दिले जाते. तसेच दिवाळी, गणेशोत्सवासारखे सण साजरे करून मुलांना भारतीय संस्कृतीबद्दलही माहिती देण्याचे काम शाळेतील प्रशिक्षित शिक्षकांकडून केले जाते. भविष्यकाळात येथे कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्याचा मानस आहे.

अवसरी अभियांत्रिकी महाविद्यालय

ग्रामीण भागातील मुलांना उच्च शिक्षण घेण्यासाठी शहराची वाट धरावी लागते. या गोष्टीचा विचार करत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तंत्रविषयक उच्च शिक्षण गावातच मिळावे, या उद्देशाने अवसरी खुर्द येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतनची सुरवात झाली आहे. या महाविद्यालयात यांत्रिकी, विद्युत, स्थापत्य, संगणक, उत्पादन, माहिती तंत्रज्ञान अशा विविध शाखांचे प्रशिक्षण दिले जाते. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या सोईसाठी चोवीस तास इंटरनेट व ग्रंथालयाची सोय या महाविद्यालयात करण्यात आली आहे. तसेच होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक कारणांमुळे शिक्षणपासून वंचित रहावे लागू नये म्हणून अनेक विधायक योजनाही महाविद्यालयात राबविल्या जातात. या महाविद्यालयामुळे ग्रामीण भागातील मुलांना थेट उद्योगधंद्यात काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते.

मंचर ग्रामीण रुग्णालय

ग्रामीण भागातील रुग्णांना वैद्यकीय सेवेसाठी शहरात धाव घ्यावी लागू नये, त्यांना गावातच तातडीची सेवा मिळावी यासाठी आंबेगाव तालुक्यातील रहिवाशांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी मंचर येथे अद्ययावत ग्रामीण रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. महिलांचे आरोग्य दृष्टीसमोर ठेवून या रुग्णालयात गर्भवती महिलांसाठी ५० खाटा आरक्षित करण्यात आल्या आहेत. तसेच सोनोग्राफी, रक्तसंकलन आणि ब्लडबँकेसारख्या अद्ययावत सुविधाही या रुग्णालयात उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसेच मोफत नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करून गावातील नागरीकांना वैद्यकीय सेवा देऊन मार्गदर्शन केले जाते. तसेच कर्करोगासारखा मोठा आजार आढळल्यास संबंधित रुग्णाला आर्थिक मदतही पुरवली जाते. गावातील जनतेच्या आरोग्याच्या हिताने उचललेले पाऊल खरचं कौतुकास्पद आहे.

 भीमाशंकर साखर कारखाना

कोणत्याही भागाचा विकास हा रोजगार संधीवर व पायाभूत सुविधावर अवलंबून असतोे. आपल्या परिसरातील नागरिकांचा विकास व्हावा, गावातील शेतकर्‍यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी विधानसभेचे सन २००० मध्ये आंबेगाव तालुक्यात भीमाशंकर साखर कारखाना सुरु केला. हा कारखाना अद्ययावत अशा संगणकीय स्त्रोत नियोजनाच्या साहाय्याने पुढारलेला आहे. या कारखान्यात साखर उत्पादनासह वीज निर्मितीही केली जाते. तसेच या साखर कारखान्याच्या माध्यमातून फक्त साखर उत्पादन न करता कारखान्याच्या माध्यमातून अंतर्गत भाग विकास निधी योजनाही राबवली जाते. या योजनेंतर्गत शेतकर्‍यांना आधुनिक शेतीविषयक माहिती पुरवणे, बाजारात आलेले नवीन बी-बियाणे, खते यांबद्दल माहिती पुरवणे तसेच सिंचन योजना राबविण्याचे काम या योजनेच्या माध्यमातून केले जाते. या कारखान्यास उत्कृष्ठ साखर कारखान्याला राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. 

गोवर्धन डेअरी प्रकल्प

मंचरचे नाव जागतिक स्तरावर पोहचविले आहे ते तेथील गोवर्धन डेअरी प्रकल्पानं. दही, दूध, ताक अशा दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीपेक्षा चीज, बटर अशा आधुनिक पदार्थांच्या निर्मितीचे धाडस पराग मिल्क प्रॉडक्टसच्या देवेंद्र शहा यांनी केले, आणि त्यातूनच साकारला गोवर्धन डेअरी प्रकल्प. या प्रकल्पामुळे सुमारे सव्वा लाख शेतकर्‍यांना रोजगार उपलब्ध झाला आहे. या डेअरीचं वेगळेपण असं, की या डेअरीत तीन हजारपेक्षा जास्त गाई असलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे काऊ मिल्क फार्म तयार करण्यात आले आहे. या फार्ममध्ये गायींची तज्ञांच्या देखरेखीखाली योग्य निगा राखली जाते. उत्तम दर्जाचे दूध मिळावे यासाठी या गायींना वेळोवेळी सकस आहार दिला जातो. दिवसातून तीनदा त्यांना मिल्किंग विभागात नेले जाते व संपूर्ण यांत्रिकरित्या या विभागात गाईंचे दूध काढले जाते. 


गो चीज प्रकल्प

गोवर्धन डेअरी प्रकल्प उभा करुन जसे आंबेगाव मंचरला एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. त्याप्रमाणेच या डेअरीने गो चीजसारख्या उच्च दर्जाच्या चीजचे उत्पादन करून शहा यांनी आशियात महाराष्ट्राचे नाव एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. आशियातील सर्वांत मोठा चीज प्रकल्प म्हणून गो चीज प्रकल्पाकडे पाहिले जाते. डेअरीत बनणार्‍या श्रीखंड, दही, पेढे या पदार्थांप्रमाणेच येथे बनणार्‍या बटर, चीजला भारताप्रमाणे भारताबाहेरही मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. हे चीज बनविताना वापरण्यात येणार्‍या युएचटी (अल्ट्रा व्हायरस टेम्परेचर) तंत्रज्ञानामुळे सामान्य वातावरणातही हे चीज सहा महिन्यांपर्यत टिकू शकते. या प्रकल्पासाठी वापरण्यात आलेल्या अद्ययावत तंत्रज्ञान व कंपनीची उत्पादन गुणवत्ता लक्षात घेत न्युझीलंडने आयएसओ प्रमाणपत्र देऊन गोवर्धनला प्रमाणित केले आहे.