Friday 21 December 2012


गुड गव्हर्नन्स ः एक सामूहिक जबाबदारी
नागपूरचे विधानभवन
आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आणि राज्यघटना अस्तित्वात आल्यापासून गेल्या ५०-६० वर्षांत प्रगतीचे अनेक टप्पे आपण पार पाडले आहेत. आपला देश विकसित झाला नसला तरी विकसनशील आहे. जगातील बलवान राष्ट्रांत भारताचा समावेश होतो. या सर्व समाधानकारक बाबी असल्या तरी या देशातील सर्वसामान्य व्यक्तींच्या आशा-आकांक्षा आहेत. त्या पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून एक सामाजिक परिवर्तन करणे आवश्यक आहे. अजूनही आर्थिक, सामाजिक असमतोल आहे. आपली अर्थव्यवस्था सध्या नाजूक स्थितीत आहे. आपला विकास दर ९ टक्के होता, तो आता ५.३० टक्क्यांपर्यंत आलेला आहे. हा दर खाली आला असला तरी बाकीच्या देशांसमोर जेवढ्या समस्या आहेत तेवढ्या समस्या आज आपल्यासमोर नाहीत. म्हणूनच या देशामध्ये गुंतवणुकीसाठी परदेशस्थ लोक किंवा उद्योगपती, शेती, शिक्षण व इतर क्षेत्रांत आपल्या देशाला सर्वोत्तम पर्याय मानतात.

या पार्श्‍वभूमीवर राज्यकर्ते म्हणून आमचे काम कसे चालले आहे? विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पहिल्या आठवड्यात सभागृहाचे कामकाज चाललेच नाही. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला असं वाटणं अत्यंत स्वाभाविक आहे, की हे सभागृह किंवा हे लोकप्रतिनिधी जनतेचा वेळ आणि पैसा नाहक खर्च करीत आहेत. त्यांना कामकाज करावयाचं नाही. त्यामुळे राजकारण म्हणजे काही तरी भयंकर आहे. तो आपला प्रांत नाही, अशी भावना निर्माण होऊ शकते. तसा गैरसमज कृपया कुणीही करून घेऊ नये. सरकार म्हणजे फक्त निवडून आलेले लोकप्रतिनिधी नाहीत. सरकारमध्ये वेगवेगळ्या स्तरांवर काम करणारे अधिकारी असतात. सनदी अधिकारी असतात. आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. केंद्र सरकारची एखादी प्रभावी योजना गावात राबवायची असेल तर आता सर्व अधिकार ग्रामपंचायतीला अथवा ग्रामसभेला दिले आहेत. लोकशाहीमध्ये एकच पर्याय नसतो. अनेक पर्याय असतात. त्यामुळे लोकांना भरपूर संधी असते. या ठिकाणी सत्ताबदल कमी-जास्त प्रमाणात होतो. त्यामुळे आपली लोकशाही प्रगल्भ झालेली आहे. पण आगामी काळात जो ‘सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट’ या न्यायानुसार सक्षम आहे तोच टिकेल. ज्याची विचारधारा, प्रशासन सक्षम आहे तोच पक्ष, तोच नेता, तोच सदस्य या स्पर्धेत टिकेल. त्यातून सुप्रशासन (गुड गव्हर्नन्स) तयार होईल. याचा अर्थ पंतप्रधान, मुख्यमंत्रीच नव्हे तर अगदी जिल्हा परिषद, पंचायत समिती अन् ग्रामपंचायतीच्या कर्मचार्‍यांवरही चांगल्या वर्तणुकीची जबाबदारी आहे. अशा या साखळीच्या माध्यमातून सरकार तयार होते. तरीही राज्यकर्ते जोपर्यंत पारदर्शक कारभार करीत नाहीत तोपर्यंत जनतेचा आमच्यावर विश्‍वास बसणार नाही. हा पारदर्शकपणा राज्यकर्त्यांनी आपल्या कार्यशैलीत आणण्याची गरज आहे. 

कदाचित हे दुष्टचक्र ‘कोंबडी आधी की अंडे’ आधी या प्रश्‍नाप्रमाणे आहे. आधी मतदारांनी जबाबदारीनं वागायचं की लोकप्रतिनिधींनी जबाबदारीनं वागायचं किंवा आधी लोकप्रतिनिधींनी जबाबदारीनं वागायचं नंतर मतदारांनी जबाबदारीनं वागायचं. मतदार तसं वागतात म्हणून आम्ही असे वागतो की आम्ही तसं वागतो म्हणून मतदार तसे वागतात, असा हा गहन प्रश्‍न आहे. प्रत्येकानं आपली जबाबदारी स्वीकारली पाहिजे म्हणजे हा प्रश्‍न सुटेल व आपली लोकशीही अधिक परिपक्व होईल. प्रसिद्धीमाध्यमांचीही भूमिका यात महत्त्वाची आहे. विधानसभेत एखादा सदस्य प्रभावीपणे बोलला तर माध्यमे त्याला प्रसिद्धी देत नाहीत. परंतु एखादा सदस्य व्यासपीठावर आला अन् त्याने राजदंड पळवून नेला, किंवा एखाद्या सदस्याने कागद फाडून भिरकावले तर वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर त्याला ठळक प्रसिद्धी मिळते. वृत्तवाहिन्यांसाठी ती ‘ब्रेकिंग न्यूज’ ठरते. अशी कृती करण्यामध्ये संबंधित सदस्याचे कोणते कर्तृत्व असते? परंतु अशा गोष्टींना प्राधान्य दिले जात असल्याने कदाचित लोकप्रतिनिधी असे वागत असतील. एखाद्या सदस्याने दिवसभर ग्रंथालयात बसून माहिती घेऊन दुसर्‍या दिवशी तासभर भाषण केले तर ‘अमूक सदस्याने चर्चेत सहभाग घेतला’ एवढीच ओळ टीव्हीवर येते. किवा वृत्तपत्रांत छापून येते. मी काय बोललो याला प्रसिद्धी मिळतच नाही. जर अशी उपेक्षा वारंवार होत असेल तर संबंधित सदस्य कशाला अभ्यासपूर्ण भाषणासाठी मेहनत करेल?  सभागृहात रंगीबेरंगी कपडे किंवा विचित्र टोपी घालून आले की मला अशा सोप्या मार्गाने भरपूर प्रसिद्धी मिळते हे त्याच्या लक्षात येईल अन् तोही तोच मार्ग अवलंबेल. या त्रुटी दूर करण्याचे काम जसे प्रसिद्धीमाध्यमांना करावे लागेल तसेच फक्त माध्यमांना दोष न देता लोकप्रतिनिधींनाही आपल्या कार्यशैलीतल्या त्रुटी दूर करण्याचे काम करावेच लागेल. 

लोकशाही व्यवस्थेत संसद, विधानमंडळ या अतिशय महत्त्वाच्या सार्वभौम संस्था आहेत. न्यायव्यवस्थेचे सार्वभौमत्व त्यांच्या ठिकाणी, सरकारचे सार्वभौमत्व सरकारच्या ठिकाणी आणि यांच्या समन्वयातून सुप्रशासन (गुड गव्हर्नन्स) बनतो. त्यातून जनहिताचे प्रश्‍न सुटण्यास मदत होते. त्यातून प्रगत राष्ट्र बनते. त्यातून एक संस्कृती बनते. त्यातून सर्वांनाच गुणवत्तापूर्ण जीवनशैली मिळते. नुसतं जगणं महत्त्वाचं नाही तर सर्वांनीच दर्जेदार जगणं महत्त्वाचं आहे. भारताची तुलना अमेरिका, युरोप किंवा इंग्लंडशी नाही. आज भारताची स्पर्धा एकाच देशाशी म्हणजे चीनशी आहे. कारण चीन आणि आपली लोकसंख्या सारखीच आहे. आज संपूर्ण जगाची बाजारपेठ काबीज करण्यासाठी चीनसारखे राष्ट्र सरसावलं आहे. आपण आपल्या गावात कोणत्याही दुकानात गेला अगदी खेळण्याच्या दुकानांत गेलो तरी तेथील खेळणी ‘मेड इन चायना’ असल्याचे आपल्या लक्षात येईल. आमच्या देशात निरक्षरतेचे प्रमाण प्रचंड आहे. अज्ञान, बेरोजगारी एका बाजूला आणि दुसर्‍या बाजूला आपले तरुण जगात महत्त्वाच्या जागा काबीज करीत आहेत. हे विरोधाभासी चित्र असले तरी जागतिक बाजारपेठ आपल्या देशासाठी सुसंधी आहे, असं मानून जर या देशाची राज्यव्यवस्था चालली आपली प्रगती नक्की होईल.  

Wednesday 12 December 2012


आदरणीय ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त...


                              बहुआयामी कर्तृत्ववान नेतृत्व


देशातील सध्याच्या मोजक्या कर्तृत्ववान नेत्यांत आदरणीय शरदचंद्र पवारसाहेबांचा समावेश होतो. गेली ४५ ते ५० वर्षे महाराष्ट्राचे राजकारण मोजक्याच नावांभोवती फिरताना आपल्याला दिसून येतं. ती नावं म्हणजे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण, राज्याच्या कृषी-औद्योगिक क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आदरणीय शरदचंद्र पवार. या नेत्यांचा महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठा प्रभाव पडला आहे. यशवंतराव चव्हाणसाहेबांचे हे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. पवारसाहेब हे त्यांचे खरे राजकीय वारसदार. पवारसाहेबांसारख्या नेत्याला घडवण्याचं श्रेय चव्हाणसाहेबांना जातं. या दोन्ही नेत्यांमध्ये अनेक साम्यस्थळं आढळतात. प्रचंड लोकसंग्रह, साधी राहणी, द्रष्टेपण, माणसाची अचूक पारख, उत्तम प्रशासन हे या दोन्ही नेत्यांचं वैशिष्ट्य. 


महाराष्ट्रात पुरोगामित्वाची परंपरा रुजवून देशाला आदर्श ठरणार्‍या कल्पक योजना, प्रकल्प राबवून चव्हाणसाहेबांनी आणि पवारसाहेबांनी महाराष्ट्राला सतत अग्रेसर ठेवलं. राजकीय अथवा वैयक्तिक जीवनात कितीही झंझावात आले तरी पवारसाहेबांनी धीरानं पावलं टाकली. आपला संयम कधीच ढळू दिला नाही. आज-काल आपल्या समाजाच्या जाणिवा बोथट झाल्या आहेत. राजकारणात सभ्यता आणि सुसंस्कृतपणा या गोष्टी हद्दपार होतील की काय, अशी भीती वाटू लागली आहे. तात्पुरत्या यशात या दोन्ही गोष्टी टिकवून ठेवणं भल्या भल्यांसाठी अशक्य झालं आहे. यशापयशाच्या पलीकडे शाश्‍वत असते ती सभ्यता. यशवंतराव चव्हाणसाहेब अशा सभ्य आणि सुसंस्कृत राजकारणातील मानदंड होते. पवारसाहेबांनीही ही मर्यादा कायम राखून चव्हाणसाहेबांचा वारसा खर्‍या अर्थानं पुढं चालवला आहे. 

पवारसाहेबांसारख्या नेत्याला घडविण्याचं श्रेय चव्हाण साहेबांना जातं. या दोन्ही नेत्यांमध्ये अनेक साम्यस्थळं आढळतात. प्रचंड लोकसंग्रह, साधी राहणी, द्रष्टेपण, माणसाची अचूक पारख, उत्तम प्रशासन हे या दोन्ही नेत्यांचं वैशिष्ट्य. त्यांचा स्वीय सहायक म्हणून काम करताना मला दीर्घ काळ त्यांचा सहवास लाभला. त्यांची कार्यशैली अभ्यासण्याची संधी मिळाली. मोजकंबोलणं, प्रश्‍नांचा अभ्यास करणं, भरपूर वाचन करणं अन् सर्व प्रकारच्या संकटांना धैर्यानं समोरं जाणं, असे पवारसाहेबांचे अनेक गुण सांगता येतील. माझ्या आगामी राजकीय वाटचालीत मला त्यातून बरंच शिकता आलं.

पवारसाहेबांनी अक्षरशः डोंगराएवढं काम उभं केलंय. न थकता सतत अठरा-वीस तास काम करण्याची त्यांची क्षमता अन्य कुठल्याही नेत्याकडं नाही. झटपट निर्णय आणि तडकाफडकी काम हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. केवळ राजकारणच नाही तर समाजकारण करणारा नेता अशीही पवारसाहेबांची ओळख  आहे. पवारसाहेबांनी काही धाडसी पुरोगामी निर्णय घेतले. राज्याच्या कल्याणासाठी काय उपयोगाचे आहे, हा धोरणीपणा त्यामागे होता. याबाबतीत मराठवाडा विद्यापीठ नामांतर, एन्रॉन वीज प्रकल्पाबाबत त्यांनी घेतलेले निर्णय ही मोठी उदाहरणं आहेत. महाराष्ट्रात पुरोगामित्वाची परंपरा रुजवण्यात पवारसाहेबांनी फार महत्त्वाची भूमिका बजावली आहे.  शेतकरीहितासाठी तर ते कायमच झटत असतात. केंद्रीय कृषिमंत्रिपदाची जबाबादारी सांभाळताना त्यांनी कायमच शेतकर्‍यांच्या कल्याणार्थ पावलं उचलली. त्यांच्या पुढाकारामुळे ७१ हजार कोटींचा कर्जमाफी योजना राबविण्यात आली. त्याचा मोठा फायदा शेतकर्‍यांना मिळाला. राज्यातील फळबागक्रांतीचे जनक म्हणूनही त्यांना ओळखलं जातं. राज्यातील औद्योगिकरणाला त्यांनी गती दिली. क्रीडाक्षेत्राच्या विकासासाठीही पवारसाहेबांनी मोठं योगदान दिलंय. राज्याच्या क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी देशी खेळांना त्यांनी प्रोत्साहन दिलं. 

महाराष्ट्रात पुरोगामित्वाची परंपरा रुजवून देशाला आदर्श ठरणार्‍या कल्पक योजना, प्रकल्प राबवून त्यांनी महाराष्ट्राला सतत अगेसर ठेवलं. राजकीय अथवा वैयक्तिक जीवनात कितीही झंझावात आले तरी पवारसाहेबांनी धीरानं पावलं टाकली. आपला संयम कधीच ढळू दिला नाही. अशा या बहुआयामी कर्तृत्ववान पवारसाहेबांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त माझ्या अंतःकरणपूर्वक शुभेच्छा!






Tuesday 11 December 2012


                     नागपूर विधिमंडळ अधिवेशनानिमित्त...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरला सुरू झाले आहे. त्यानिमित्त ... 

संयुक्त  महाराष्ट्र निर्माण झाला तेव्हा  मराठवाड्यासह विदर्भ महाराष्ट्रात समाविष्ट झाला. त्यावेळी नागपूर करार करण्यात आला. त्या करारातील तरतुदीप्रमाणे नागपूर अधिवेशन घेतलं जावं असं ठरलं. या अधिवेशनाच्या निमित्तानं विदर्भातील प्रश्‍न मार्गी लागावेत, ही अपेक्षा त्या काळात होती अन् आजही आहे. या करारानुसार हे अधिवेशन सहा आठवडे व्हावं, अशी तरतूद आहे. परंतु एखादा अपवाद वगळता नागपूर अधिवेशनाचा काळ कमी होत चालला आहे, हे मान्य केलं पाहिजे. विधिमंडळ अधिवेशनाचा कार्यकाळ राज्यपालांनी केलेल्या शिफारशींनुसार निश्‍चित होत असतो. तो वाढविण्यासाठी सत्तारूढ आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांनी एकत्र येऊन त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. 

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात निव्वळ गोंधळच होतो, असं नाही. तर काही चांगल्या मुद्द्यांवरही चर्चा होते. मात्र, सभागृहात होत असलेल्या चांगल्या चर्चेऐवजी सभागृहात अथवा सभागृहाबाहेर घातलेल्या गोंधळाला अधिक प्रसिद्धी मिळत असल्यामुळे मग चर्चेऐवजी गोंधळाचा पर्याय निवडला जातो. काही वेळा गोंधळ घालण्याची सदस्यांची इच्छा नसते. पण त्यांच्या पक्षांच्या भूमिकेमुळे ते बांधील असतात. त्यामुळे त्याचा पक्षपातळीवर विचार होऊन चर्चेवर भर देण्याचा प्रयत्न झाल्यास ही स्थिती बदलू शकते. एखाद्या मागणीसाठी रस्त्यावर येऊन आंदोलन करण्याची प्रवृत्ती वाढल्यानं घटनात्मक दर्जा असलेल्या संस्था कमकुवत होत असल्याचा भास होत असला तरीही या देशाच्या लोकशाहीनं असे अनेक हल्ले यशस्वीपणे परतवून लावले आहेत. गेल्या दोन अधिवेशनांचा माझा अनुभव असा आहे, की या स्थितीत उत्तरोत्तर सुधारणा होत आहे. सन्मानीय  विधिमंडळ सदस्य आता अधिक जबाबदारीनं वागत आहेत. चर्चेद्वारे प्रश्‍न सोडवावेत, यावर त्यांचा भर वाढला आहे, ही स्वागतार्ह बाब आहे. विधानसभेचे अधिवेशन विदर्भात होत असताना सन्माननीय सदस्यांनी विदर्भाच्या प्रश्‍नांना अधिक न्याय द्यायला हवा. त्या संदर्भात सभागृहात अधिक गांभीर्यानं चर्चा व्हावी. सरकारनंही गांभीर्यानं आपली भूमिका स्पष्ट करावी. विदर्भातील अधिवेशन ही औपचारिकता ठरू नये. विधायक निर्णय घेणारं, असं हे लक्षणीय अधिवेशन व्हावं.

विधानसभा किंवा विधान परिषदेत पक्षीय अभिनिवेशातून चर्चा होते. पण पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून राज्याच्या विकासाचा व्यापक उद्देश डोळ्यांसमोर ठेवून सांगोपांग चर्चा करण्याची गरज आहे. काही लोकप्रतिनिधींना कामकाजाची, तसेच केंद्र-राज्य सरकारच्या योजनांची माहितीच नसल्यामुळे प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. तरीही सभागृहातील कामकाजात किती सहभाग घेतला, हाच फक्त एखाद्या लोकप्रतिनिधीच्या मूल्यमापनाचा मापदंड होऊ शकत नाही. सभागृहात जे सदस्य बोलत नाहीत, ते शासनाच्या विविध समित्यांवर उत्तमरित्या अन् प्रभावीपणे काम करत असतात. नियोजन समित्यांमध्ये त्यांचे योगदान असते. आपल्या मतदारसंघात विविध योजनांचा लाभ पोचवून तसेच विविध विकासकामे हे लोकप्रतिनिधी करत असतात. त्यांचा जनसंपर्क दांडगा असतो. त्यामुळे एखाद्या लोकप्रतिनिधीचं मूल्यमापन त्याच्या या योगदानातून केलं जावं. 

जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महापालिका, नगरपालिका यांच्या अखत्यारीतील प्रश्‍न विधिमंडळ सभागृहात उपस्थित करण्यात येतात. या संस्थांना स्वायतत्ता दिली आहे. त्यावर चर्चेचा अधिकार सभागृहाला निश्‍चित आहे. पण त्यातच सभागृहाच्या कामकाजाचा वेळ बहुत करून जातो. विधिमंडळात संपूर्ण राज्यासाठीच्या धोरणांवर अधिक चर्चा व्हावी, असं अपेक्षित आहे. विधिमंडळाच्या कामकाजातील ‘फ्लोअर मॅनेजमेंट’, ‘टाईम मॅनेजमेंट’ आणि ‘सबजेक्ट मॅनेजमेंट’ अचूक असायला हवं. सर्व पक्षातील नेत्यांनी, सदस्यांनी विषय निश्‍चित करून, वाटून घेऊन त्यावर सभागृहात चर्चा घडवून आणावी. जुन्या सदस्यांनी नव्या सदस्यांनाही वाव द्यावा. जुने आणि नवे सदस्य यांच्यात समन्वय ठेवल्यास, हे नक्कीच शक्य होईल. त्यामुळे संबंधित विषयांवर सरकारचं लक्ष प्रभावीपणे वेधलं जाईल. एकूण चांगला परिणाम  साधता येईल. अर्थातच हा विषय संबंधित पक्षांच्या अधिकारातील आहे. पण एवढी किमान अपेक्षा त्यांच्याकडून ठेवल्यास ते चुकीचं ठरणार नाही.
---------------------------------------------------------------

Monday 19 November 2012




दिशादर्शक विचारमंथन

विधिमंडळाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्र विधिमंडळातर्फे पुण्याच्या विधान भवनात (कौन्सिल हॉल) ९ नोव्हेंबरला एकदिवसीय विभागीय परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादात राज्याच्या औद्योगिक वाटचालीचं सिंहावलोकन आणि भविष्यातील धोरण या विषयावर, तसेच पुणे महसुली विभागातील स्थानिक समस्या या दोन विषयांवर विचारमंथन झालं. केंद्रीय कृषी मंत्री आणि ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा परिसंवाद झाला.  उद्योगमंत्री नारायण राणे, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, वनमंत्री पतंगराव कदम आदींसह विविध मान्यवरांनी यात भाग घेतला. हा परिसंवाद नक्कीच यशस्वी झाला.

या परिसंवादाच्या मागचा उद्देश पाहता, या व्यासपीठावरून झालेलं विचारमंथन राज्याच्या औद्योगिक वाटचालीला अन् पुणे विभागाच्या स्थानिक समस्यांवरील उपाययोजनांबाबत दिशादर्शक ठरणार आहे. समतोल प्रादेशिक विकासासाठी अनुशेष ठरविताना यापुढे तालुका हाच घटक धरून नियोजन केले जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांनी केली. त्याचप्रमाणे दर पाच वर्षांनी मानवी विकास अहवाल (ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स) तयार करण्यात येईल, अशीही घोषणा त्यांनी केली. तसेच राज्यातील प्रत्येक विभागाचा विकास आराखडा (व्हिजन डॉक्युमेंट) तयार करण्यात येईल, असंही त्यांनी यावेळी जाहीर केले. मला वाटतं, हे या परिसंवादाचं यश आहे. हे विषय विविध व्यासपीठांवरून मी आतापर्यंत सातत्यानं मांडत आलोय. त्याबाबतचा निर्णय या परिसंवादातील विचारमंथनातून दृष्टिपथात आला. तसेच समतोल प्रादेशिक विकासासाठी औद्योगिक विकेंद्रीकरणाचा मुद्दाही यावेळी अधोरेखित झाला.

अनुशेषाचा विचार करताना विभाग हा घटक मानल्यानं प्रादेशिक असमतोल निर्माण झाला आहे. उदाहरणार्थ पुणे विभागात बराच परिसर हा संपन्न आहे. या भागात अधिक पर्जन्यमान असल्यानं पाण्याची मुबलक उपलब्धता आहे. पण त्याच बरोबर या भागात पर्जन्यछायेचा प्रदेशही आहे. त्यामुळे अनेक तालुक्यांत सातत्यानं पाण्याचं दुर्भिक्ष्य, दुष्काळ असतो. प्रादेशिक विकासाचा अनुशेष ठरविताना विभागाचा सरसकट विचार झाल्यानं या विभागातील दुष्काळाचा सामना करणार्‍या तालुक्यांवर अन्याय होत आहे. त्यामुळे ही पद्धत बदलून तालुकानिहाय स्वतंत्र विचार करण्याची सूचना मांडली होती. मात्र, मानवी विकासाच्या निर्देशांक दर पाच वर्षांनी तयार करण्याबाबत माझं वेगळं मत आहे. हा निर्देशांक दर पाच वर्षांनी काढल्यानं सरकारी धोरणांतील त्रुटी शोधून त्यावर मात करण्याच प्रक्रिया (Corrective Measures ) लांबेल. ही प्रक्रिया गतिमान करायची असेल तर किमान दोन वर्षांनी हा निर्देशांक काढून त्यानुसार सरकारला आपल्या धोरणांत बदल करण्यात येतील. सरकारनं यावर अवश्य विचार करावा, असं वाटतं.

महाराष्ट्राच्या औद्योगिक वाटचालीवर झालेल्या विचारमंथनात राज्याचं उद्योगक्षेत्रात असलेल्या स्थानावर यावेळी उहापोह झाला. सुप्रशासन, पायाभूत सुविधा आणि उद्योगांना अनुकूल धोरणं अशी त्रिसूत्री उद्योजकांचे प्रतिनिधी अभय फिरोदिया यांनी सुचविली. क्रेडाई महाराष्ट्र या बांधकाम व्यावसायिकांच्या संस्थेचे अध्यक्ष सतीश मगर यांनी कृषी क्षेत्रानंतर सर्वाधिक रोजगार देणारं बांधकाम क्षेत्र असूनही त्याची सरकारकडून उपेक्षा होत असल्याची खंत व्यक्त केली. शहरीकरणाचा वेग खूप असल्यानं शहराचा विकास आराखडा २० ऐवजी दर १० वर्षांनी तयार करण्याचा अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसंच परवडणार्‍या घरांसाठी सर्वंकष धोरण आखण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. उद्योगमंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेत प्रगत राष्ट्र आहे, याची सविस्तर आकडेवारी दिली. राज्याचं हे अग्रस्थान टिकवण्यासाठी प्रस्तावित औद्योगिक धोरणात अनेक पावलं उचलली आहेत, हे त्यांनी अधोरेखित केलं. विदर्भ, मराठवाडा, खानदेशाचा विचार या नव्या औद्योगिक धोरणात केल्याचं त्यांनी सांगितलं. उद्योगांसाठी चटई निर्देशांक वाढीसह ‘वॉक टू वर्क’ ही परदेशातील संकल्पना राज्यात राबविण्यासाठी ‘इंडस्ट्रियल टाऊनशिप’ प्रस्तावित आहेत, असी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. कामगार कायद्यात बदल करताना कामगारापेक्षा रोजगाराला वाचविणे गरजेचं असल्याची सूचना ज्येष्ठ उद्योजक फिरोदिया यांनी केली होती. त्यांचा संदर्भ घेत मुख्यमंत्र्यांनी रोजगार वाचविताना म्हणजे औद्योगिक वित्तीय पुनर्रचना मंडळानेही उद्योगांच्या मालकांना वाचवण्यापेक्षा उद्योग वाचविण्यावर भर दिला पाहिजे, असं आवर्जून सांगितलं.

शरदचंद्र पवारसाहेबांनी राज्याच्या समतोल विकासासाठी विदर्भ, खानदेश, मराठवाडा व ग्रामीण भागांत जाण़ार्‍या उद्योगांना सवलती देऊन त्यांच्या विकेंद्रीकरणावर भर दिला पाहिजे, असे सांगितले. त्यासाठी गुंतवणुकीला पोषक व अनुकूल कायदे केल्याशिवाय गत्यंतर नाही. यासंदर्भात भूसंपादनविषयक विधेयक येत्या लोकसभा अधिवेशनात मांडण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली. शेतीला पूरक उद्योगधंदे विकसित झाले पाहिजेत. दुग्ध व्यवसायाचे मार्केटिंग करण्यात आपण कमी पडतो. जनावरामागे दूधउत्पादन वाढीसाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. या विचारमंथनांतून असे अनेक महत्त्वाचे मुद्दे समोर आले. विधानसभा किंवा विधान परिषदेत पक्षीय अभिनिवेशातून चर्चा होते. पण पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून राज्याच्या विकासाचा व्यापक उद्देश डोळ्यांसमोर ठेवून सांगोपांग चर्चा घडविण्यासाठी एका व्यासपीठाची गरज होती. ते व्यासपीठ यानिमित्तानं विधानमंडळानं उपलब्ध करून दिलं. विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे, शिवसेेनेच्या नेत्या आमदार नीलम गोर्‍हे आदींनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून या व्यासपीठावरून सरकारला उपयुक्त ठरतील अशा सूचना केल्या.

संतसाहित्याचे गाढे अभ्यासक आणि महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब भारदे यांनी विधानमंडळाला दिलेली उपमा अतिशय सार्थ आणि समर्पक आहे. त्यांनी म्हंटलय, की विधिमंडळ म्हणजे लोकशाहीचं पवित्र मंदिर असून, या मंदिरातील देव मात्र मंदिराच्या बाहेर आहेत. अन् लोकप्रतिनिधी म्हणजे या मंदिराचे पुजारी. हाच दृष्टिकोन ठेवून आगामी काळात आमच्यासारखे सर्व लोकप्रतिनिधी काम करतील, ही अपेक्षा आहे. या परिसंवादामागे महाराष्ट्राची आगामी काळातील वाटचाल अधिक दमदार व्हावी, हा उद्देश आहे. यशवंतराव चव्हाणसाहेबांनी संयुक्त महाराष्ट्राचा मंगलकलश आणला, त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात राज्याच्या सर्वांगीण प्रगतीच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा गाठला जावा, हीच सदिच्छा.

--------------------------------------------------

Thursday 8 November 2012




पुण्याचे विधानभवन - एक गौरवशाली इतिहास




महाराष्ट्र विधिमंडळाचे अमृत महोत्सवी वर्ष, तसेच आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्र विधिङ्कंडळातर्फे शुक्रवारी (ता. ९) एकदिवसीय विभागीय परिसंवाद पुण्याच्या विधान भवनात (कौन्सिल हॉल) आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त... 


------------------------------------------------------------------------
महाराष्ट्राच्या विधिमंडळाला देशात वेगळी प्रतिष्ठा लाभली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आतापर्यंत सर्वच क्षेत्रांत राज्याला, त्याचबरोबर देशालाही नेतृत्व देणारे अनेक दिग्गज नेते महाराष्ट्रानं दिले आहेत. या सर्वच नेत्यांनी आपल्या कर्तृत्वानं व झळाळत्या कामगिरीनं भारतीय लोकशाहीची प्रतिष्ठा तर उंचावली अन् राज्याला आणि पर्यायानं देशाला सर्वच क्षेत्रांमध्ये अग्रक्रम मिळवून दिला. यात महाराष्ट्र विधिमंडळाचे योगदान अनन्यसाधारण आहे. यासंदर्भात पुण्याच्या विधानभवनाला (कौन्सिल हॉल) ऐतिहासिक महत्त्व आहे. 

विधानमंडळाचे अमृतमहोत्सवी वर्ष, तसेच आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार (स्व.) यशवंतरावजी चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून विधिमंडळातर्फे विविध उपक्रम राबविण्यात आले. विधिमंडळात ‘महाराष्ट्र ः काल, आज आणि उद्या’ हा परिसंवाद घेण्यात आला. देेश, राज्याच्या विकासासाठी सत्ताधार्‍यांसह  विरोधी पक्ष, विविध क्षेत्रांतील मान्यवर व तज्ञ मंडळी यांना एकत्र आणून विकासाची प्रक्रिया गतिमान करण्याची गरज आहे. विधानसभा अध्यक्ष या नात्याने या प्रक्रियेला चालना देण्याच्या कामास हातभार लावण्याचे प्रयत्न माझ्याकडून सुरू आहेत. स्वातंत्र्य मिळवून आपल्याला ६४ वर्षे झाली. महाराष्ट्राची निर्मिती होऊन ५२ वर्षे झाली. विधिमंडळ निर्माण होऊन ७५ वर्षे झाली. त्यानिमित्त झालेल्या या परिसंवादरूपी विचारमंथनांतून महाराष्ट्राचे देशात काय स्थान आहे, हे समजून घेण्यास मदत झाली. या परिसंवादासह विभागीय परिसंवादातून काही विषय निश्‍चित करून, नंतर या विषयांतील तज्ञांद्वारे राज्यात आगामी पन्नास वर्षांसाठी संबंधित क्षेत्रांत काय करता येईल, यासंदर्भात ‘व्हिजन डॉक्युमेंट’ तयार करण्यात येईल. पुण्यात शुक्रवारी (ता. ९) होणारा परिसंवाद याच उपक्रमाचा एक भाग आहे. 

१९३५ च्या भारत सरकारच्या कायद्यानुसार १७५ सदस्य असलेल्या विधानसभेचे पहिले अधिवेशन १९ जुलै १९३७ रोजी पुण्यात कॉन्सिल हॉलमध्ये भरले होते. तर २९ सदस्य असलेल्या विधानपरिषदेचे अधिवेशन २० जुलै १९३७ रोजी झाले. तत्कालीन गव्हर्नरांनी गणेश कृष्ण चितळे यांची विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली होती. याच विधानसभा अधिवेशनात २१ जुलै १९३७ रोजी गणेश वासुदेव मावळंकर अध्यक्ष म्हणून व नारायण गुरुराव जोशी हे उपाध्यक्ष म्हणून निवडून आले होते. तसेच २२ जुलै १९३७ रोजी विधान परिषदेचे सभापती म्हणून मंगळदास पक्वासा व उपसभापती म्हणून रामचंद्र सोमण निवडून आले होते. स्वातंत्र्यानंतर म्हणजे १५ ऑगस्ट १९४७ नंतर काही काळ विधानसभेचे अध्यक्षपद कुंदनमल फिरोदिया यांनी, तर उपाध्यक्षपद षणमुगप्पा अंगडी यांनी भूषविले. पुण्यातील अधिवेशनातच मांडून नंतर मंजूर झालेला ‘द्विभार्या प्रतिबंधक कायदा’  सामाजिक परिवर्तनाच्या दिशेनं टाकलेलं महत्त्वाचं पाऊल होतं. हरिजनांना मंदिर प्रवेशाची मुभा देणारा महत्त्वाचा कायदाही याच कौन्सिल हॉलमध्ये मंजूर करण्यात आला. पुढेे राज्यघटनेनं अस्पृश्यता नष्ट केली व केंद्रानंही तसा कायदा केला. पण त्या दिशेनं पहिलं दिशादर्शक पाऊल या विधिमंडळानं टाकलं. या विधिमंडळाचा आणखी एक महत्त्वाचा पुरोगामी निर्णय म्हणजे कुळवहिवाट आणि शेतजमीन कायदा. १९४७ मध्ये पुणे विद्यापीठाची स्थापना करण्यासाठी पुणे विद्यापीठ कायदा निर्माण करण्यात आला. हे सर्व ऐतिहासिक निर्णय पुण्याच्या विधानभवनात झाले. याच कौन्सिल हॉलमध्ये कामगार नेते श्रीपाद अमृत डांगे यांचे औद्योगिक संबंध कायद्याला विरोध करणारे सुमारे सहा तासांचे विक्रमी भाषण झाले. हा विक्रम अजून कोणीही मोडलेला नाही. 

पुण्याच्या कौन्सिल हॉलची वास्तू अनेक ऐतिहासिक घटनांची साक्षीदार ठरली. याच हॉलमध्ये विधानसभेच्या बैठकीत पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी ६ ऑक्टोबर १९४९ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास ऐतिहासिक भाषण केले. पं. नेहरूंचे हे मार्गदर्शन एकमेवाद्वितीय ठरले. प्रांतांना स्वायतत्ता देताना राष्ट्रीय ऐक्याकडे दुर्लक्ष होता कामा नये, असे पं. नेहरूंनी यावेळी आवर्जून सांगितले. सामाजिक-आर्थिक विषमता संपविणे गरजेचे आहे, असे सांगून पं. नेहरूंनी आपल्या भाषणातून जमीन सुधारणाविषयक धोरण तयार करण्याविषयी सुचविले. आगामी काळात याच विधिमंडळाने कसेल त्याची जमीन, कमाल जमीनधारणा कायद्यासह शेतकरीहिताचे अनेक कायदे करून पं. नेहरू यांनी व्यक्त केलेला विश्‍वास सार्थ ठरविला अन् सांसदीय लोकशाहीची पताका मोठ्या डौलानं फडकत ठेवली. विधिमंडळाच्या ७५ वर्षांच्या इतिहासात पुण्याच्या विधानभवनात १९३७ ते ५५ पर्यंत एकूण १३ अधिवेशने झाली. त्यात जनहिताने अनेक निर्णय आणि महत्त्वाचे कायदे करण्यात आले. पुण्याच्या विधानभवनातच विधिमंडळाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त १७ फेब्रुवारी १९८९ ला चर्चासत्राचे आयोजन केले होते.    

पुण्याच्या अशा या विधानभवनाच्या या गौरवशाली इतिहासाच्या मंगलस्मृतींना उजाळा मिळण्यासाठी विधिमंडळाच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून शुक्रवारी  (ता. ९) हा परिसंवाद आयोजित केला आहे. महाराष्ट्राची आगामी काळातील वाटचाल अधिक दमदार व्हावी, हा या प्रयत्नांमागचा उद्देश आहे. ज्या यशवंतराव चव्हाणसाहेबांनी संयुक्त महाराष्ट्राचा मंगलकलश आणला, त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात राज्याच्या सर्वांगीण प्रगतीच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा गाठला जावा, हीच सदिच्छा. 

---------------------------------------------------------------------------------------

Tuesday 16 October 2012




गुड इकॉनॉमिक्स इज गुड पॉलिटिक्स!



केंद्र सरकारने आर्थिक सुधारणांसाठी धडाकेबाज निर्णय घेण्यास सुरवात केली आहे. मल्टिब्रँड रिटेल क्षेत्रात ५१ टक्के थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय), सिंगल ब्रँड रिटेल क्षेत्रात हेच प्रमाण शंभर टक्के असेल. नागरी विमान वाहतूक क्षेत्रात ४९ टक्के, प्रसारण क्षेत्रात ७४ टक्के, विमा क्षेत्रात २६ वरून ४९ टक्के, तर पेन्शन क्षेत्रातही परकी गुंतवणुकीची मर्यादा २६ वरून ४९ टक्क्यांवर नेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. देशाच्या आर्थिक धोरणांच्या इतिहासातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. कोणत्या पार्श्‍वभूमीवर हे निर्णय घेण्यात आले, हे आपल्याला समजावून घेणं आवश्यक आहे. 

रुपयाची घटती बाह्य किंमत, अर्थसंकल्पातील वाढती तूट, युरोप-अमेरिकेत वाढत असलेली मंदी, अन्नधान्याचे वाढलेले भाव, आंतरराष्ट्रीय व्याापारात वाढलेली तूट, परिणामी देशी औद्योगिक उत्पादनाच्या निर्देशांकातील वाढती घसरण, लक्षणीय बेरोजगारी, गुंतवणूक क्षेत्रात निर्माण झालेलं शैथिल्य अशा पार्श्‍वभूमीवर हे निर्णय केंद्र सरकारला घ्यावे लागले. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमधील घटक पक्षांच्या विरोधामुळं सरकारला परकी गुंतवणुकीबाबत सबुरीची भूमिका घ्यावी लागली होती. हे क्षेत्र परकी गुंतवणुकीसाठी खुलं न केल्याने देशाच्या एकंदर गुंतवणुकीच्या स्थितीवर त्याचा विपरीत परिणाम होऊ लागला होता. अर्थसंकल्पातील काही तरतुदींमुळे तर देशातील परकी संस्थागत गुंतवणूक, तसेच परकी गुंतवणूकदारांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. त्यांनी गुंतवणूक काढून घेण्यास सुरवात केली होती. यासाठी अखेर सरकारनं आपलं अस्तित्व पणाला लावून हे निर्णय घेतले. या निर्णयांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होणार आहेत. सुधारणांचे धोरण पुन्हा सुरू झाल्यामुळे अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ दूर होईल. 

विमा व पेन्शन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूक आल्याने हा पैसै सरकारला पायाभूत विकासासाठी वापरता येईल. या योजनांमधील पैसा मोठ्या काळापर्यंत देशातच राहणार असल्याने परदेशी कंपन्यांनी पैसै काढून घेतल्यास देशाची अर्थव्यवस्था कोलमडेल ही भीती अनाठायी आहे. या दोन्ही क्षेत्रांतून मोठ्या प्रमाणावर डॉलरमध्ये पैसा आल्याने रुपयाची किंमत वधारण्यासही मदत होणार आहे. मल्टिब्रँड रिटेल क्षेत्रात ५१ टक्के परकीय गुंतवणुकीस मान्यता दिल्याने शेतकर्‍यांना त्याचा लाभ होणार आहे. शेतमाल योग्य वेळेत बाजारपेठेत न गेल्याने होणारे सुमारे ५५ हजार कोटी रुपयांचे नुकसान त्यामुळे वाचेल. कारण वॉलमार्ट, टेस्को, कॅरिफर अशा बहुराष्ट्रीय रिटेल कंपन्या हा शेतमाल थेट शेतातून घेतील. थेट विक्रेत्यांनाच शेतमाल विकणे शक्य झाल्याने मधल्या पातळीतील दलालांकडून शेतकर्‍यांची होणारी फसवणूक बंद होईल. त्याच बरोबर किरकोळ क्षेत्रात रोजगारनिर्मितीच्या संधी अनेक पटींनी वाढतील.

    बहुराष्ट्रीय रिटेल कंपन्या हा शेतमाल थेट शेतातून घेतील. थेट विक्रेत्यांनाच शेतमाल विकणे शक्य 
झाल्याने मधल्या पातळीतील दलालांकडून शेतकर्‍यांची होणारी फसवणूक बंद होईल.

रिटेल गुंतवणूकदारांना तीस टक्के खरेदी भारतातील अतिलघु, लघु आणि मध्यम उद्योगांकडून करण्याचे बंधनही घालण्यात आले आहे. त्यामुळे या क्षेत्रालाही चालना मिळेल. सिंगल ब्रँड रिटेलसाठीही याच प्रकारची मार्गदर्शक तत्त्वे निश्‍चित करण्यात आली आहे. हे मॉल दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्येच परकीय कंपन्यांना सुरू करता येणार आहेत. त्यामुळे छोट्या शहरांतील व्यापार्‍यांना त्यांचा धोका नाही. दहा किलोमीटरच्या परिघात दुसरा मॉल उघडता येणार नाही. त्यामुळे त्या ठिकाणच्या इतर दुकांनांना स्पर्धा निर्माण होणार नाही. ग्राहकांचा ओघ छोट्यामोठ्या खरेदीसाठी लहान व्यापार्‍यांकडेच राहील. निधीचा ओघ वाढेल स्पर्धेत तग धरून उभे राहण्यासाठी उत्तम दुकाने व व्यवस्था यावर भर दिला जाईल. शासनाच्या महसूलउत्पन्नात उल्लेखनीय वाढ होईल. ग्राहकांना उपलब्ध होणार्‍या उत्पादनांत प्रचंड वैविध्य येईल. त्याचबरोबर गुणवत्तापूर्ण आंतरराष्ट्रीय उत्पादने मिळू शकतील. 

परकीय गुंतवणुकीमुळे वर्षभरात सुमारे एक कोटी नोकर्‍या उपलब्ध होऊ शकतील. त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्‍न सुटण्यास हातभार लागेल, अशी माहिती इंडियन स्टाफिंग फेडरेशनने दिली आहे. यामुळे चाळीस लाख जणांना प्रत्यक्ष रोजगार मिळेल. ५०-६० लाखांना अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होईल. अल्पशिक्षित आणि अल्पकौशल्यधारक कर्मचार्‍यांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. त्यामुळे किरकोळ व्यापार क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीला वाव मिळाल्यास शेतकर्‍यांना फायदा होणार आहे. छोट्या शहरांत हे मॉल उघडता येणार नसल्याने येथील छोट्या व्यापार्‍यांचा कुठलाही तोटा होणार नाही. दहा किलोमीटरच्या परिघात दुसरा मॉल उभारण्याची परवानगी नसल्याने या परिघातील छोट्या दुकानांनाही फार मोठा फटका बसणार नाही. 

या आर्थिक सुधारणा एवढ्यावरच थांबतील असं नाही. येत्या काही दिवसांत आणखी काही महत्त्वाचे आर्थिक निर्णयही घेतले जाण्याची शक्यता आहे. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय गुंतवणूक मंडळ (नॅशनल इन्व्हेस्टमेंट बोर्ड) प्रस्तावित आहे. एक हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणुकींचे प्रकल्प अशा मंडळांकडून जलद गतीनं मान्य केले जावेत, असं अपेक्षित आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात व्यापारी कर्जे उभारण्याच्या प्रक्रिया अधिक सोप्या केल्या जाण्याचीही शक्यता आहे. अर्थसंकल्प सुधारण्यासाठी नवे करप्रस्ताव, कर्जव्यवस्थापन, अंशदान कपाती आगी उपाययोजना सुचविल्या जातील. वस्तू व सेवाकर अमलात आणण्यासाठी राज्यांकडे आग्रह धरला जाईल. सेबीसारख्या नियंत्रक संस्था भांडवली प्रभाववाढीसाठी सुधारणा करण्याची शक्यता आहे. आणखी निर्गुंतवणुकीचे निर्णय घेतले जातील. मोठ्या गुंतवणूक प्रकल्पांना जलद मान्यता मिळण्यासाठी पावले उचलण्यात येतील. विमा कंपन्यांना पायाभूत क्षेत्रात अधिक गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जाईल. केंद्र सरकारने आतापर्यंत घेतलेले निर्णय धाडसीच आहेत. त्याची परिपूर्ण कार्यवाही कशी होईल, यावर पुढील परिणाम ठरतील. आगामी काळातही अशी पावले उचलली जाणार असल्यानं त्याला राज्यांच्या पातळीवर किती पाठिंबा मिळतो, यावर बरेच काही अवलंबून राहील. 

थेट परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्राचा सहावा क्रमांक लागला आहे, असे निष्कर्ष असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इडस्टी ऑफ इंडिया (असोचेम) या संस्थेने राज्यांच्या केलेल्या सर्वेक्षणातून काढले आहेत. एफडीआयसाठी सर्वाधिक पसंतीचे राज्य ओडिशा ठरले आहे. या राज्यात ४९ हजार ५२७ कोटींचे एफडीआयचे प्रस्ताव आले आहेत. ओडिशाखालोखाल, आंध्र प्रदेश (३३ हजार ९३६ कोटी), गुजरात (२० हजार २५८ कोटी), छत्तीसगड (२० हजार कोटी) व कर्नाटक (१४ हजार कोटी) यानंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो. महाराष्ट्रात एक हजार ४१४ कोटींचे एफडीआय प्रस्ताव आले, तरी प्रत्यक्षात १२ हजार कोटींची एफडीआय गुंतवणूक होणार आहे, असे ‘असोचेम’च्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष आहेत. राज्याच्या भवितव्यासाठी या गुंतवणुकी अधिकाधिक कशा आकर्षित करता येईल, यासाठी पावलं उचलावी लागतील. महाराष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्यासाठी हे गरजेचं आहे. भारताची अर्थव्यवस्था अधिक सशक्त करण्यासाठी केंद्रानं हे निर्णय घेतले आहेत. आपल्या अर्थव्यवस्थेला आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वसमावेशक रूप मिळण्याची गरज आहे. देशांतर्गत विकासदर आठ टक्क्यांच्या वर जाऊन या देशातील सर्वसामान्यांचे हित त्याद्वारे जपण्याचा प्रयत्न आहे. शेवटी सगळ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी ‘गुड इकॉनॉमिक्स इज गुड पॉलिटिक्स’ हाच सध्याच्या परिस्थितीतील योग्य उपाय ठरू शकतो. 



Tuesday 9 October 2012



‘पुणे बस दिवस’च्या निमित्ताने...



येत्या एक नोव्हेंबरला ‘पुणे बस दिवस’ राबविण्याच्या ‘सकाळ’च्या उपक्रमाचे मी मनःपूर्वक स्वागत करतो. शहरात वाढलेल्या गर्दीमुळे वाहतुकीच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. विविध कारणांनी झालेल्या असमतोल विका
सामुळे पुणे-मुंबईसारख्या शहरांत मागासलेल्या भागातून व इतर शहरांतून गर्दीचा महापूर येत आहे. वाढलेल्या गर्दीमुळे शहरांतील सर्वच यंत्रणांवर ताण येत आहे. प्रदूषण, अतिक्रमणामुळे शहराच्या आजूबाजूच्या जैवविविधतेचे, पर्यावरणाचेही अपरिमित नुकसान होत आहे. वाढत्या गर्दीचा ताण सार्वजनिक वाहतुकीवर येत आहे. त्यामुळे पुण्यासारख्या ठिकाणी ‘पीएमपीएमएल’च्या बसची संख्या प्रवाशांच्या तुलनेत अपुरी ठरत आहे. वाढत्या शहरीकरणात दूर उपनगरांत राहणार्‍या रहिवाशांना रोजच्या प्रवासासाठी नाईलाजाने दुचाकी, चारचाकी अथवा खासगी वाहने वापरावी लागत आहेत. 



पुणे पूर्वी सायकलींचे शहर होते. पेन्शनरांचे पुणे असे त्याची ओळख होती. आता मात्र आयटी हब आणि तरुणांचे पुणे झाले आहे. या शहरातील बरेचसे रस्ते हे पूर्वीच्या नियोजनानुसार आहेत. पण सध्या वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे गे रस्ते अपुरे पडत आहेत. पर्यायाने वाहतुकीचा ताण वाढत आहे. अपघात, प्रदूषणात प्रचंड वाढ झाली आहे. या समस्येवर मात करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक सक्षम करणे हा एक महत्त्वाचा उपाय आहे. पीएमपीएलची बससेवा सक्षम व सर्वदूर पोहोचल्यास वाहनांच्या वाढत्या संख्येला आळा बसू शकेल. या समस्येवर ‘सकाळ’ने आपल्या ‘पुणे बस दिवस’ या उपक्रमाद्वारे प्रकाशझोत टाकला आहे. त्याद्वारे आगामी काळात ‘पीएमपीएमएल’ची सेवा अधिक सक्षम होऊन प्रदूषणमुक्त पुणे निर्माण व्हावे, हीच माझीही अपेक्षा आहे.



यानिमित्ताने काही गोष्टी आवर्जून सांगाव्या लागतील. पुण्या-मुंबईसारख्या महानगरांतील गर्दीच्या नियोजनासाठी फ्लायओव्हर, मेट्रो रेल्वे, मोनो रेल आदी प्रकल्प राबवावे लागत आहेत. त्यासाठी उद्योग हे जिल्ह्या जिल्ह्यात, गावा-गावांत नेण्यात आले तर मोठ्या शहरात होणारे स्थलांतर थांबेल. शहरी-ग्रामीण भाग, गरीब-श्रीमंत, उत्पादक-ग्राहक व सुशिक्षित-अशिक्षितांत मोठी दरी आहे. ही दरी कमी करण्यासाठी निर्णायक पावले उचलावी लागतील. पाणी, रस्ते, दरडोई उत्पन्नाद्वारे ‘मानवी विकासाचा निर्देशांक’ ही संकल्पना या राज्यात आपण मांडली. हा निर्देशांक दहा वर्षांपूर्वीचा अथवा विभागनिहाय काढून चालणार नाही. तो तालुकानिहाय काढावा लागेल. राज्याच्या मागासलेल्या भागात उद्योजकांनी उद्योग उभारले पाहिजेत. त्याआधारे प्रादेशिक असमतोल भरून काढावा लागेल. तरच संबंधित भागात आपल्याला प्रयत्नपूर्वक दरडोई उत्पन्न वाढविता येईल. मागास भागांकडे उद्योजक आकर्षित व्हावेत, यासाठी सरकारला दूरदृष्टीने नियोजनपूर्वक पावले टाकावे लागतील. रस्ते, पाणी, वीज बाजारव्यवस्था चांगल्या होणं गरजेचं आहे. नैसर्गिक संपत्तीचा चांगला वापर करण्याची गरज आहे. 



औद्योगिकीकरणामुळे परिसरातील रहिवाशांची आर्थिक उन्नती होऊ लागते. त्यांची मुले शिकू लागतात. राहणीमान उंचावते. तथापि, प्रत्येक चांगल्या गोष्टीला काही उणिवांच्या बाजू असतात, त्याचप्रमाणे या विकासालाही काही मर्यादा आहेत आणि त्या आपण वेळीच जाणून घेऊन त्यावर उपाय शोधले पाहिजेत. पाण्यामुळे काही ठिकाणी शेतीचा विकास होत असताना आता उद्योगधंद्यांमुळे शेतीचे क्षेत्र कमी होऊ लागले आहे. त्यासाठी आता शेतकर्‍यांना कमी क्षेत्रात जास्त आणि बाजारात गुणवत्तेत कुठेही कमी पडणार नाही अशी पिके घेण्याचे कसब अंगिकारणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांना नवनव्या तंत्रांचा वापर करता आला पाहिजे. काही परिसरात पाणी नाही, अन् काही परिसरात इतका पाण्याचा वापर आपण करतो, की आता जमिनी क्षारयुक्त व्हायला लागल्या आहेत. आमच्या पूर्वजांनी आमच्यासाठी कोरडवाहू जमिनी तरी ठेवल्या होत्या. आम्ही मात्र पुढच्या पिढ्यांसाठी नापीक जमिनीच ठेवणार आहोत की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. त्यावर सजगपणे उपाय करणे, ही आता काळाची खरी गरज आहे.



Thursday 13 September 2012

गणेशोत्सवाचे मांगल्य सर्वार्थाने जपावे...

गणेशोत्सव आता जवळ आलाय. यंदा अधिक मासामुळे हा उत्सव थोडा उशिराच येत आहे. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरवात करून देशबांधणीचे अन् सामाजिक एकोप्यासाठी बहुमोल कार्य केले. त्यानंतर गेल्या सुमारे शंभर वर्षांत या उत्सवाच्या स्वरुपात अनेक बदल झाले. सध्या या उत्सवाला आलेले भडक स्वरूप, होणारे ध्वनिप्रदूषण आणि इतर गैरप्रकार पाहता मूळ  संकल्पनेपासून हा उत्सव फारकत घेतो की काय, अशी भीती मनात उत्पन्न होते. आपल्याकडे प्रत्येक मंगलकार्याची, शुभकार्याची सुरवात श्री गणेशाला वंदन करून होते. आबालवृद्धांचे आवडते असे हे दैवत.  अशा या  आपल्या आवडत्या दैवताच्या उत्सवाचीही आपण सर्व वाट पाहत असतो. पण हा उत्सव साजरा करत असताना त्यामागच्या  मूळ संकल्पनेचा आपल्याला विसर पडता कामा नये.



यंदा तर सर्वत्र दुष्काळाचे सावट असताना अत्यंत साधेपणाने सर्वच मंडळांनी हा उत्सव साजरा करण्याची गरज आहे. जमा झालेल्या वर्गणीचा उपयोग मंडळांना समाजोपयोगी उपक्रमांसाठी करता येईल. तसा विचार प्रत्येक मंडळाने करावा, असे वाटते. काही मंडळे वर्गणी खंडणी गोळा करावी तशी जमा  करतात. अशा दहशतीच्या मार्गाने हा उत्सव आनंदात साजरा कसा होणार?  मंडळांचे मंडप रहदारीला अडथळा होणार नाही, असे उभारावेत. दहशतवादी घटनांचे सावट सर्वत्र आहे. त्यामुळे पोलिस व अन्य सुरक्षायंत्रणांवर ताण येत आहे. त्यामुळे उत्सवकाळात गर्दीच्या ठिकाणी संशयास्पद वस्तूच्या स्वरुपांत स्फोटके पेरण्याचा धोका असतो. मंडळांसह सर्वच नागरिकांनी याबाबत अत्यंत सतर्क राहून पोलिसांना सहकार्य करण्याची गरज आहे. हा उत्सव गणेशासारख्या मांगल्याचे प्रतीक असलेल्या ओंकारस्वरूप दैवताचा आहे.  त्यामुळे  मंडपातच जुगार, पत्त्यांचे आणि दारुचे अड्डे जमविणार्‍या कार्यकर्त्यांनी सामाजिक, आध्यात्मीक आणि आत्मीक भान बाळगून हे गैरप्रकार टाळावेत.



हा उत्सव साजरा करताना पर्यावरणरक्षणाचीही आपली जबाबदारी आहे. या उत्सवासाठी पर्यावरणपूरक पर्याय अवलंबिले पाहिजेत. पर्यावरणजतनासाठीचे उपाय अवलंबताना अगदी गणेशमूर्तीपासूनच सुरवात करण्याची गरज आहे. पूर्वी गणेशमूर्ती आकाराने आणि उंचीने छोट्या असत. आता मात्र अधिकाधिक उंच मूर्ती आणण्यासाठी  मंडळांमध्ये चढाओढ लागते. अशा  मूर्तींच्या विसर्जनानंतर जलाशयातील प्रदूषणाचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढते. या  मूर्ती शाडूऐवजी मोठ्या प्रमाणात ‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’च्या असतात. ‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’ पाण्यात विरघळत नसल्याने प्रदूषण तर होतेच तसेच या मूर्ती हलक्या असल्याने बुडत नाहीत अन् खंडित स्वरुपात उघड्यावर येतात. आपल्या दैवताच्या मूर्तीची असे विसर्जन कुणालाच पटणारे नाही. त्यामुळे एक तर शाडूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी. अन्यथा या  मूर्तींचे विसर्जन टाळावे. अन्य छोट्या  मूर्तीचे प्रतिकात्मक  विसर्जन करावे. काही मंडळे दर वर्षी धातूची अथवा लाकडाच्या एकाच कायमस्वरुपी  मूर्तीची उत्सवकाळात प्रतिष्ठापना करतात. अन् सुपारीरुपी गणेशाची विधिवत पूजा करून त्याचे विसर्जन करतात. बहुसंख्य  मंडळांनी असेच केल्यास गणेश मूर्ती विसर्जनाचे प्रमाण घटण्यास नक्कीच मदत होईल. ‘एक गाव एक गणपती’प्रमाणे शहरांतही ‘एक गल्ली एक गणपती’ अथवा ‘एक सोसायटी एक गणपती’ असे उपक्रम राबविण्याची गरज आहे. त्यामुळे गणेशमूर्तींची संख्या कमी होऊ शकेल. 



गणेशोत्सवात आकर्षक देखावे-रोषणाई करण्यात येते. या देखाव्यांसाठी तसेच रोषणाईसाठी मोठ्या प्रमाणात विजेचा वापर होतो. ग्रामीण भागात वीजटंचाई असताना विजेचा असा अपव्यय परवडणारा नाही. त्यामुळे तो कमी करण्यासाठी ‘सीएफएल’ अथवा ‘एलईडी’सारख्या दिव्यांचा वापराद्वारे रोषणाई करून वीजबचत करण्याची गरज आहे. या काळात मोठ्या प्रमाणावर ध्वनिप्रदूषण होत असते. ध्वनिक्षेपक, ध्वनिवर्धकांद्वारे ध्ननिमर्यादेचे उल्लंघन सर्रास होत असते. या ध्वनिप्रदूषणाचा परिणाम आरोग्यावर होत असतो. ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, बालके, गर्भवती महिलांवर याचे दुष्परिणाम होत असतात, याचे भान मंडळांनी ठेवावे. त्याच प्रमाणे गणेशोत्सवाच्या मिरवणुकांत गुलाल उधळतात. त्यातील रसायनेही प्रकृतीस घातक असतात. डोळे, त्वचाविकार आणि श्वसनाचे विकार त्यामुळे होतात.  गुलालाला पर्याय म्हणून गुलालाऐवजी फुलांच्या पाकळ्यांचा वापर करता येईल. डीजे अन् स्पीकर्सच्या मोठमोठ्या भिंती टाळून  मोजक्या पारंपरिक वाद्यांचा वापर करून हा उत्सव साजरा करता येणे शक्य आहे. 



सरते शेवटी गणेश विसर्जनाबाबतीत एक आवर्जून सुचवावेसे वाटते. नद्या आणि जलाशयांत प्रदूषण वाढत आहे. सध्याचे दुष्काळाचे वातावरण पाहता जलाशयांतही पाणी मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहे. अशा काळात घातक रसायनांपासून तयार केलेल्या रंगांनी रंगविलेल्या ‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’च्या लाखो मूर्ती या नद्या, तळ्यांत अन् विहिरींत विसर्जित केल्या तर हे पाणी पिण्याजोगे अथवा वापरण्याजोगेही राहणार नाही. जलाशयांतील मासे व अन्य जलचरांच्या जीवालाही त्यामुळे धोका पोहोचतो. सध्याच्या तीव्र पाणीटंचाईच्या काळात तर हे परवडणारेच नाही. त्यामुळे गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम जलाशयांत (विसर्जन हौद) करता येईल. घरच्या घरी बादलींतही या मूर्ती विसर्जित करून विरघळलेल्या मातीयुक्त पाण्याचा वापर अंगणातल्या झाडांसाठी करता येईल. निर्माल्य  जलाशयात विसर्जित न करता ते मोठ्या प्रमाणावर एकत्र करून त्यापासून उत्तम खतनिर्मितीही करता येते. त्याचे प्रशिक्षणही मंडळांतर्फे देता येईल. सर्वच मंडळांनी यावर कृतिशील निर्णय घेणे, हीच काळाची खरी गरज आहे. असे सर्व काळाला अनुसरून विधायक उपक्रम राबविले तर या मंगलमूर्तीच्या उत्सवात खर्‍या अर्थाने मांगल्य, पावित्र्य जपले जाईल. आपल्या निसर्गाचे रक्षणही होईल. पर्यायाने समाजाचे म्हणजेच तुमचे आमचेही हितरक्षणही त्यातच आहे.

Wednesday 5 September 2012

अनुसया महिला सहकारी पतसंस्थेचे उदघाटन  करताना अनुसया दत्तात्रेय वळसे पाटील 

महिला सबलीकरणाच्या वाटचालीतील सुचिन्हे

मुलगा आणि मुलीला समान न्याय द्यायला हवा. मुलीला जगण्याचा हक्क व समानतेचा हक्क मिळाला पाहिजे. तरच देशाच्या प्रगतीला हातभार लागेल. समाजात महिलांचे प्रमाण पन्नास टक्के असल्याने, त्यांना भेदभावाची वागणूक देणे चुकीचे आहे. महिलांना समाजात बरोबरीचे स्थान न दिल्यास भारत जागतिक महासत्ता होऊ शकणार नाही. 

मुलगा- मुलगी, गरीब-श्रीमंतांमधील दरी दूर करण्याचे काम करण्याची गरज आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जरी स्त्रियांना पन्नास टक्के आरक्षण असले, तरी त्यांना समानतेची वागणूक मिळण्यासाठी समाजाची मानसिकता बदलायला हवी. एकाच घरातील मुलगा आणि मुलीचे संगोपन समान पद्धतीने होत नाही. मुलाला चांगले शिक्षण दिले जाते, तर मुलीला त्यापासून वंचित ठेवले जाते. मुलीच्या लग्नात हुंडा द्यावा लागतो, ती घराण्याचे नाव लावत नाही अशा कारणांनी मुलीबाबत दुजाभाव केला जातो. स्त्रीभ्रुणहत्येसारखे घृणास्पद प्रकार घडतात.  

महिलांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी मंचर परिसरात आम्ही प्रयत्न सुरू केले. महिलांना विश्‍वास वाटावा, न्याय मिळावा यासाठी तीन वर्षांपूर्वी अनुसया महिला उन्नती केंद्राची स्थापना करण्यात आली. या केंद्राशी आंबेगाव-शिरूर परिसरातील १६०० बचतगटांतील सुमारे सोळा हजार महिला जोडल्या गेल्या आहेत. आपल्या पायावर उभे राहण्याचा विश्‍वास महिलांमध्ये निर्माण करण्यात अनुसया महिला उन्नती केंद्र यशस्वी झाले आहे. या केंद्रातर्फे आगामी काळात आंबेगाव-शिरूर मतदारसंघातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. उद्योग, व्यवसायाचे मार्गदर्शन, प्रकल्प अहवाल व बँकांकडून अर्थसाह्य मिळवून देण्याचे काम केले जात आहे. निराधार व परित्यक्ता महिलांसाठीही असलेल्या वैयक्तिक लाभाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे. महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठी अनुसया केंद्रातर्फे स्वतंत्र कार्यक्रम तयार करण्यात येणार आहे. महिलांनी स्वावलंबी होण्याचा दृढनिश्‍चय करावा. व्यक्तिगत जीवनात अनेक छोटे-मोठे प्रश्‍न असून, ते सोडविण्याची अपेक्षा सर्वांना असते. त्याच्यासाठीही नजीकच्या काळात या केंद्रातर्फे योजना हाती घेतल्या जातील. महिलांना सामाजिक न्याय मिळवून देण्याच्या भूमिकेबरोबरच त्यांच्यासाठी आर्थिक न्याय प्रस्थापित करावा लागेल.

अन् महिलांना आर्थिक न्याय देण्याच्या दिशेने आम्ही एक पाऊल नुकतेच उचलले. मंचर येथे अनुसया पतसंस्थेची स्थापना करण्यात आली. राजकारण, तसेच पुरुषांच्या हस्तक्षेपापासून ही पतसंस्था अलिप्त ठेवली जाईल. आंबेगाव परिसरात महिला बचतगटांची चळवळ चांगलीच रुजली आहे. या बचतगटांना राष्ट्रीयीकृत  बँका आणि खासगी क्षेत्रातील बँकांकडून मागणीनुसार कर्जपुरवठा मिळत नसल्याचे आढळल्याने खास महिलांसाठी पतसंस्थेची स्थापण्यात आली. मुलांचे शिक्षण, आजारपणात मदत तसेच व्यवसायासाठी महिलांना पतपुरवठा करण्याचे काम या पतसंस्थेतर्फे होणार आहे. आंबेगाव तालुक्यात तीन हजार २६८ बचतगट असून, त्यापैकी ६६८ गट दारिद्‌रयरेषेखाली आहे. तर २६०० बचतगट दारिद्‌रयरेषेवर आहेत. दारिद्‌रयरेषेखालील बचतगटांना सरकारी योजनांचा लाभ होतो. उर्वरित बचतगटांना पतसंस्थेतर्फे आर्थिक मदत करण्यात येईल. बचतगटांना कर्ज देताना अनुसया महिला उन्नती केंद्राची शिफारस घ्यावी लागेल. सभासदांचा आरोग्यविमा उतरविला जाईल.
   
महिला सबलीकरणाच्या चळवळीचा भाग म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण दिले गेले. त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेतच. त्याच प्रमाणे इतर क्षेत्रांतही ग्रामीण भागातील महिलाही आरक्षणाविना आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवित आहेत. अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील बाजारपेठेतील विविध व्यवसायांत महिलांनी वर्चस्व प्रस्थापित केले आहे. कुटुंब आणि व्यवसाय या दोन्ही आघाड्या या महिला समर्थपणे सांभाळत आहेत. व्यवसायाद्वारे हजारो रुपयांची उलाढाल करून या महिला कुटुंबाची आर्थिक प्रगती करत आहेत. अवसरी बुद्रुक ही मंचर तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठ आहे. या बाजारपेठेत विविध उत्पादनांची सुमारे ८० ते ९० दुकाने आहेत. त्यातील बहुतांश दुकाने महिला सांभाळत आहेत. या मोठ्या व्यवसायांसह लहान-सहान व्यवसायही महिला सांभाळत आहेत. महिला सबलीकरणाच्या दिशेने सकारात्मक वाटचाल होत असल्याची ही सुचिन्हे आहेत.

Monday 20 August 2012

शिक्षणाचा अधिकार कायद्याविषयी...


मुलांसाठी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क (राईट टू एज्युकेशन) कायदा मंजूर झाला. ही भारतातील मुलांसाठी एक ऐतिहासिक घटना आहे. भारतीय इतिहासात प्रथमच सरकारद्वारे कुटुंबे आणि लोकसमुदाय यांच्या मदतीने मुलांना त्यांच्या गुणवत्तापूर्ण प्राथमिक शिक्षणाच्या हक्काची हमी दिली जात आहे. भारताच्या मूळ संविधानात शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकारांच्या यादीत आलेला नाही. पण मार्गदर्शक तत्त्वांमध्ये मोफत आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा समावेश करण्यात आला होता. संविधानाच्या निर्मितीनंतर दहा वर्षांच्या आत शासन मोफत व सक्तीच्या शिक्षणास मूलभूत अधिकाराचा दर्जा देईल, अशी संविधानकर्त्यांची अपेक्षा होती. मात्र, स्वातंत्र्यानंतर तब्बल दहा दशकानंतर केंद्र सरकारने शिक्षणाच्या अधिकाराचा ठराव संमत केला.  त्यामुळे सहा ते १४ वर्षे वयोगटातील प्रत्येक मुलाला मोफत आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा मूलभूत अधिकार मिळणार आहे. याठिकाणी हे लक्षात घेतले पाहिजे, की बालकांसाठी मोफत शिक्षण आहे आणि त्यांना शिक्षण देण्याची बालकांवर सक्ती, असे अभिप्रेत आहे. याशिवाय सहा वर्षांपर्यंतच्या मुलांना शिक्षण देण्याची जबाबदारीही मार्गदर्शक तत्त्वांद्वारे शासनावर आली आहे. महात्मा गांधीजींनीही १९३७ मध्येच अशा शिक्षणाची गरज असल्याचे मत व्यक्त केले होते.  

मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी  घेऊ शकणार्‍या आयसीएसई, सीबीएसई, इंटरनॅशनल स्कूल, प्रायोगिक शाळा किंवा खासगी शाळांमध्ये आपल्या पाल्याला प्रवेश घेणार्‍या पालकांवर या कायद्याद्वारे मिळालेल्या अधिकारांचा वापर करायचा किंवा नाही, याचा पर्याय आहे. हा कायदा खरे तर वंचितांसाठी आहे. ज्यांना शिक्षण घेता येत नाही, ज्यांच्यापर्यंत शिक्षण अजून पोहोचू शकले नाही, अशांसाठी हा कायदा आहे. आदिवासींसाठी, भटक्या-विमुक्तांसाठी, स्थलांतर करणार्‍या ऊसतोडणी अथवा बांधकाम मजुरांसाठी, अपंगांसाठी, बालकामगारांसाठी आणि आर्थिक-सामाजिक विषमतेचे बळी ठरलेल्या लाखोंसाठी हा कायदा आहे. 

या कायद्यात अनेक चांगल्या तरतुदी आहेत. उदाहरणार्थ ः मोफत प्राथमिक शिक्षण, मुलांचा शारीरिक अथवान मानसिक छळ करण्यास शाळांना मज्जाव, शिक्षण देण्याची शासनावर सक्ती, शाळाबाह्य मुलांना शिक्षणप्रवाहात येण्याची संधी मिळणार, ठराविक परिसरात शाळेची उपलब्धता, जन्मदाखला नसल्याच्या कारणास्तव प्रवेश नाकारता येणार नाही, शाळांना कॅपिटेशन, डोनेशन घेता येणार नाही, वर्षभरात कधीही शाळेत दाखल होण्याची संधी, पालकांचा सहभाग असलेल्या शाळा व्यवस्थापन समित्यांची निर्मिती तसेच वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना २५ टक्के आरक्षण, शिवाय या मुलांच्या किंवा त्यांच्या पालकांच्या मुलाखतीही घेतल्या जाणार नाहीत. या मुलांना शाळेतून काढून टाकता येणार नाही. तसेच शिक्षकांना जनगणना, निवडणुका व आपत्ती मदतकार्याव्यतिरिक्त इतर कामे दिली जाणार नाहीत. अशा अनेक चांगल्या तरतुदी या कायद्यात आहेत. शिक्षणाचा हा हक्क मुलांना मिळवून देणे ही केंद्र व राज्य सरकारची कायदेशीर जबाबदारी राहील.  

प्रत्येक मुलाला प्राथमिक शिक्षण (इयत्ता आठवीपर्यंतचे) पूर्ण करावे लागेल या तरतुदीचा अर्थ विद्यार्थ्यांना आठवीपर्यंत नापास केले जाऊ नये, एवढा मर्यादित अर्थ काढण्यात आला आहे. मूल्यमापनाच्या आधारे एका एखाद्या विषयात मागे राहिलेल्या विद्यार्थ्यावर त्या विषयासाठी अधिक मेहनत घेतली जाणे व सर्व विद्यार्थी प्राथमिक शिक्षण पूर्ण करण्यास आवश्यक शैक्षणिक  क्षमता प्राप्त करतील, असा या तरतुदींचा खरा अर्थ आहे. कायदा आणि ठराव केल्यामुळे मुले शाळेत जातील, असे मुळीच नाही. मुलांना शिक्षणाचा हक्क आहे, की नाही हे महत्त्वाचे नाही तर आपण आपली सामाजिक जबाबदारी पार पाडून किती मुलांना शिक्षम देऊ शकतो अन् खर्‍या गरजू मुलांना या कायद्याचा लाभ मिळणार की नाही, हा खरा मुद्दा आहे.