Thursday 13 September 2012

गणेशोत्सवाचे मांगल्य सर्वार्थाने जपावे...

गणेशोत्सव आता जवळ आलाय. यंदा अधिक मासामुळे हा उत्सव थोडा उशिराच येत आहे. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरवात करून देशबांधणीचे अन् सामाजिक एकोप्यासाठी बहुमोल कार्य केले. त्यानंतर गेल्या सुमारे शंभर वर्षांत या उत्सवाच्या स्वरुपात अनेक बदल झाले. सध्या या उत्सवाला आलेले भडक स्वरूप, होणारे ध्वनिप्रदूषण आणि इतर गैरप्रकार पाहता मूळ  संकल्पनेपासून हा उत्सव फारकत घेतो की काय, अशी भीती मनात उत्पन्न होते. आपल्याकडे प्रत्येक मंगलकार्याची, शुभकार्याची सुरवात श्री गणेशाला वंदन करून होते. आबालवृद्धांचे आवडते असे हे दैवत.  अशा या  आपल्या आवडत्या दैवताच्या उत्सवाचीही आपण सर्व वाट पाहत असतो. पण हा उत्सव साजरा करत असताना त्यामागच्या  मूळ संकल्पनेचा आपल्याला विसर पडता कामा नये.



यंदा तर सर्वत्र दुष्काळाचे सावट असताना अत्यंत साधेपणाने सर्वच मंडळांनी हा उत्सव साजरा करण्याची गरज आहे. जमा झालेल्या वर्गणीचा उपयोग मंडळांना समाजोपयोगी उपक्रमांसाठी करता येईल. तसा विचार प्रत्येक मंडळाने करावा, असे वाटते. काही मंडळे वर्गणी खंडणी गोळा करावी तशी जमा  करतात. अशा दहशतीच्या मार्गाने हा उत्सव आनंदात साजरा कसा होणार?  मंडळांचे मंडप रहदारीला अडथळा होणार नाही, असे उभारावेत. दहशतवादी घटनांचे सावट सर्वत्र आहे. त्यामुळे पोलिस व अन्य सुरक्षायंत्रणांवर ताण येत आहे. त्यामुळे उत्सवकाळात गर्दीच्या ठिकाणी संशयास्पद वस्तूच्या स्वरुपांत स्फोटके पेरण्याचा धोका असतो. मंडळांसह सर्वच नागरिकांनी याबाबत अत्यंत सतर्क राहून पोलिसांना सहकार्य करण्याची गरज आहे. हा उत्सव गणेशासारख्या मांगल्याचे प्रतीक असलेल्या ओंकारस्वरूप दैवताचा आहे.  त्यामुळे  मंडपातच जुगार, पत्त्यांचे आणि दारुचे अड्डे जमविणार्‍या कार्यकर्त्यांनी सामाजिक, आध्यात्मीक आणि आत्मीक भान बाळगून हे गैरप्रकार टाळावेत.



हा उत्सव साजरा करताना पर्यावरणरक्षणाचीही आपली जबाबदारी आहे. या उत्सवासाठी पर्यावरणपूरक पर्याय अवलंबिले पाहिजेत. पर्यावरणजतनासाठीचे उपाय अवलंबताना अगदी गणेशमूर्तीपासूनच सुरवात करण्याची गरज आहे. पूर्वी गणेशमूर्ती आकाराने आणि उंचीने छोट्या असत. आता मात्र अधिकाधिक उंच मूर्ती आणण्यासाठी  मंडळांमध्ये चढाओढ लागते. अशा  मूर्तींच्या विसर्जनानंतर जलाशयातील प्रदूषणाचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढते. या  मूर्ती शाडूऐवजी मोठ्या प्रमाणात ‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’च्या असतात. ‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’ पाण्यात विरघळत नसल्याने प्रदूषण तर होतेच तसेच या मूर्ती हलक्या असल्याने बुडत नाहीत अन् खंडित स्वरुपात उघड्यावर येतात. आपल्या दैवताच्या मूर्तीची असे विसर्जन कुणालाच पटणारे नाही. त्यामुळे एक तर शाडूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी. अन्यथा या  मूर्तींचे विसर्जन टाळावे. अन्य छोट्या  मूर्तीचे प्रतिकात्मक  विसर्जन करावे. काही मंडळे दर वर्षी धातूची अथवा लाकडाच्या एकाच कायमस्वरुपी  मूर्तीची उत्सवकाळात प्रतिष्ठापना करतात. अन् सुपारीरुपी गणेशाची विधिवत पूजा करून त्याचे विसर्जन करतात. बहुसंख्य  मंडळांनी असेच केल्यास गणेश मूर्ती विसर्जनाचे प्रमाण घटण्यास नक्कीच मदत होईल. ‘एक गाव एक गणपती’प्रमाणे शहरांतही ‘एक गल्ली एक गणपती’ अथवा ‘एक सोसायटी एक गणपती’ असे उपक्रम राबविण्याची गरज आहे. त्यामुळे गणेशमूर्तींची संख्या कमी होऊ शकेल. 



गणेशोत्सवात आकर्षक देखावे-रोषणाई करण्यात येते. या देखाव्यांसाठी तसेच रोषणाईसाठी मोठ्या प्रमाणात विजेचा वापर होतो. ग्रामीण भागात वीजटंचाई असताना विजेचा असा अपव्यय परवडणारा नाही. त्यामुळे तो कमी करण्यासाठी ‘सीएफएल’ अथवा ‘एलईडी’सारख्या दिव्यांचा वापराद्वारे रोषणाई करून वीजबचत करण्याची गरज आहे. या काळात मोठ्या प्रमाणावर ध्वनिप्रदूषण होत असते. ध्वनिक्षेपक, ध्वनिवर्धकांद्वारे ध्ननिमर्यादेचे उल्लंघन सर्रास होत असते. या ध्वनिप्रदूषणाचा परिणाम आरोग्यावर होत असतो. ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, बालके, गर्भवती महिलांवर याचे दुष्परिणाम होत असतात, याचे भान मंडळांनी ठेवावे. त्याच प्रमाणे गणेशोत्सवाच्या मिरवणुकांत गुलाल उधळतात. त्यातील रसायनेही प्रकृतीस घातक असतात. डोळे, त्वचाविकार आणि श्वसनाचे विकार त्यामुळे होतात.  गुलालाला पर्याय म्हणून गुलालाऐवजी फुलांच्या पाकळ्यांचा वापर करता येईल. डीजे अन् स्पीकर्सच्या मोठमोठ्या भिंती टाळून  मोजक्या पारंपरिक वाद्यांचा वापर करून हा उत्सव साजरा करता येणे शक्य आहे. 



सरते शेवटी गणेश विसर्जनाबाबतीत एक आवर्जून सुचवावेसे वाटते. नद्या आणि जलाशयांत प्रदूषण वाढत आहे. सध्याचे दुष्काळाचे वातावरण पाहता जलाशयांतही पाणी मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहे. अशा काळात घातक रसायनांपासून तयार केलेल्या रंगांनी रंगविलेल्या ‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’च्या लाखो मूर्ती या नद्या, तळ्यांत अन् विहिरींत विसर्जित केल्या तर हे पाणी पिण्याजोगे अथवा वापरण्याजोगेही राहणार नाही. जलाशयांतील मासे व अन्य जलचरांच्या जीवालाही त्यामुळे धोका पोहोचतो. सध्याच्या तीव्र पाणीटंचाईच्या काळात तर हे परवडणारेच नाही. त्यामुळे गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम जलाशयांत (विसर्जन हौद) करता येईल. घरच्या घरी बादलींतही या मूर्ती विसर्जित करून विरघळलेल्या मातीयुक्त पाण्याचा वापर अंगणातल्या झाडांसाठी करता येईल. निर्माल्य  जलाशयात विसर्जित न करता ते मोठ्या प्रमाणावर एकत्र करून त्यापासून उत्तम खतनिर्मितीही करता येते. त्याचे प्रशिक्षणही मंडळांतर्फे देता येईल. सर्वच मंडळांनी यावर कृतिशील निर्णय घेणे, हीच काळाची खरी गरज आहे. असे सर्व काळाला अनुसरून विधायक उपक्रम राबविले तर या मंगलमूर्तीच्या उत्सवात खर्‍या अर्थाने मांगल्य, पावित्र्य जपले जाईल. आपल्या निसर्गाचे रक्षणही होईल. पर्यायाने समाजाचे म्हणजेच तुमचे आमचेही हितरक्षणही त्यातच आहे.

Wednesday 5 September 2012

अनुसया महिला सहकारी पतसंस्थेचे उदघाटन  करताना अनुसया दत्तात्रेय वळसे पाटील 

महिला सबलीकरणाच्या वाटचालीतील सुचिन्हे

मुलगा आणि मुलीला समान न्याय द्यायला हवा. मुलीला जगण्याचा हक्क व समानतेचा हक्क मिळाला पाहिजे. तरच देशाच्या प्रगतीला हातभार लागेल. समाजात महिलांचे प्रमाण पन्नास टक्के असल्याने, त्यांना भेदभावाची वागणूक देणे चुकीचे आहे. महिलांना समाजात बरोबरीचे स्थान न दिल्यास भारत जागतिक महासत्ता होऊ शकणार नाही. 

मुलगा- मुलगी, गरीब-श्रीमंतांमधील दरी दूर करण्याचे काम करण्याची गरज आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जरी स्त्रियांना पन्नास टक्के आरक्षण असले, तरी त्यांना समानतेची वागणूक मिळण्यासाठी समाजाची मानसिकता बदलायला हवी. एकाच घरातील मुलगा आणि मुलीचे संगोपन समान पद्धतीने होत नाही. मुलाला चांगले शिक्षण दिले जाते, तर मुलीला त्यापासून वंचित ठेवले जाते. मुलीच्या लग्नात हुंडा द्यावा लागतो, ती घराण्याचे नाव लावत नाही अशा कारणांनी मुलीबाबत दुजाभाव केला जातो. स्त्रीभ्रुणहत्येसारखे घृणास्पद प्रकार घडतात.  

महिलांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी मंचर परिसरात आम्ही प्रयत्न सुरू केले. महिलांना विश्‍वास वाटावा, न्याय मिळावा यासाठी तीन वर्षांपूर्वी अनुसया महिला उन्नती केंद्राची स्थापना करण्यात आली. या केंद्राशी आंबेगाव-शिरूर परिसरातील १६०० बचतगटांतील सुमारे सोळा हजार महिला जोडल्या गेल्या आहेत. आपल्या पायावर उभे राहण्याचा विश्‍वास महिलांमध्ये निर्माण करण्यात अनुसया महिला उन्नती केंद्र यशस्वी झाले आहे. या केंद्रातर्फे आगामी काळात आंबेगाव-शिरूर मतदारसंघातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. उद्योग, व्यवसायाचे मार्गदर्शन, प्रकल्प अहवाल व बँकांकडून अर्थसाह्य मिळवून देण्याचे काम केले जात आहे. निराधार व परित्यक्ता महिलांसाठीही असलेल्या वैयक्तिक लाभाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे. महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठी अनुसया केंद्रातर्फे स्वतंत्र कार्यक्रम तयार करण्यात येणार आहे. महिलांनी स्वावलंबी होण्याचा दृढनिश्‍चय करावा. व्यक्तिगत जीवनात अनेक छोटे-मोठे प्रश्‍न असून, ते सोडविण्याची अपेक्षा सर्वांना असते. त्याच्यासाठीही नजीकच्या काळात या केंद्रातर्फे योजना हाती घेतल्या जातील. महिलांना सामाजिक न्याय मिळवून देण्याच्या भूमिकेबरोबरच त्यांच्यासाठी आर्थिक न्याय प्रस्थापित करावा लागेल.

अन् महिलांना आर्थिक न्याय देण्याच्या दिशेने आम्ही एक पाऊल नुकतेच उचलले. मंचर येथे अनुसया पतसंस्थेची स्थापना करण्यात आली. राजकारण, तसेच पुरुषांच्या हस्तक्षेपापासून ही पतसंस्था अलिप्त ठेवली जाईल. आंबेगाव परिसरात महिला बचतगटांची चळवळ चांगलीच रुजली आहे. या बचतगटांना राष्ट्रीयीकृत  बँका आणि खासगी क्षेत्रातील बँकांकडून मागणीनुसार कर्जपुरवठा मिळत नसल्याचे आढळल्याने खास महिलांसाठी पतसंस्थेची स्थापण्यात आली. मुलांचे शिक्षण, आजारपणात मदत तसेच व्यवसायासाठी महिलांना पतपुरवठा करण्याचे काम या पतसंस्थेतर्फे होणार आहे. आंबेगाव तालुक्यात तीन हजार २६८ बचतगट असून, त्यापैकी ६६८ गट दारिद्‌रयरेषेखाली आहे. तर २६०० बचतगट दारिद्‌रयरेषेवर आहेत. दारिद्‌रयरेषेखालील बचतगटांना सरकारी योजनांचा लाभ होतो. उर्वरित बचतगटांना पतसंस्थेतर्फे आर्थिक मदत करण्यात येईल. बचतगटांना कर्ज देताना अनुसया महिला उन्नती केंद्राची शिफारस घ्यावी लागेल. सभासदांचा आरोग्यविमा उतरविला जाईल.
   
महिला सबलीकरणाच्या चळवळीचा भाग म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण दिले गेले. त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेतच. त्याच प्रमाणे इतर क्षेत्रांतही ग्रामीण भागातील महिलाही आरक्षणाविना आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवित आहेत. अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील बाजारपेठेतील विविध व्यवसायांत महिलांनी वर्चस्व प्रस्थापित केले आहे. कुटुंब आणि व्यवसाय या दोन्ही आघाड्या या महिला समर्थपणे सांभाळत आहेत. व्यवसायाद्वारे हजारो रुपयांची उलाढाल करून या महिला कुटुंबाची आर्थिक प्रगती करत आहेत. अवसरी बुद्रुक ही मंचर तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठ आहे. या बाजारपेठेत विविध उत्पादनांची सुमारे ८० ते ९० दुकाने आहेत. त्यातील बहुतांश दुकाने महिला सांभाळत आहेत. या मोठ्या व्यवसायांसह लहान-सहान व्यवसायही महिला सांभाळत आहेत. महिला सबलीकरणाच्या दिशेने सकारात्मक वाटचाल होत असल्याची ही सुचिन्हे आहेत.