Saturday 8 March 2014

घरातूनच व्हावेत स्त्री समानतेचे संस्कार

जागतिक महिला दिन. या दिनानिमित्त आठवडाभर कार्यक्रमांची एकच झुंबड. कुठे सत्कार, कुठे पुरस्कार, कुठे चर्चा, कुठे मुलाखती...असे उपक्रम सर्वत्र राबविले जातील. या जागतिक महिला दिनाचा अगतिक महिलांना काय उपयोग असतो हो, पण महिला अगतिक राहिल्याच नाही आता... असाच सूर अलिकडे उमटायला लागलाय. महिलांसाठी खास कायदे, त्यांना संरक्षणाची विशेष तरतूद असे सर्व काही असताना महिलांची स्थिती पूर्णपणे बदललीये का... याचे उत्तर दुर्दैवाने नकारार्थी येते.

स्त्रियांमध्ये अनेक विषमता आहेत. स्तर आहेत. उतरंड आहे. विवाहित, अविवाहित, विधवा, कुमारिका अथवा नवरा असण्या-नसण्यावरून झालेली ही वर्गवारी कुठेतरी थांबली पाहिजे. संपवली पाहिजे, तरच महिलांवरील अन्याय संपण्यास मदत होईल. याशिवाय मुलगा असलेली, मुलगी असलेली, मूलच नसलेली अशही अदृश्य श्रेष्ठ-कनिष्ठता महिलांत अस्तित्वात असते. तीही मनामनांतून हद्दपार कशी होईल, याचा विचार केला पाहिजे. यातून लेक वाचवा मोहिमेला बळ मिळेल. स्त्रीभ्रूण हत्त्या थांबवता येईल. आपल्या समाजात जाती-पंथांची तथाकथित उतरंड आढळते. की जातिव्यवस्था प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आपले जीवनव्यवहार नियंत्रित करत जाते. रोटी-बेटी व्यवहार नियंत्रित करत जाते. या सगळ्यात मग कधी सूड म्हणून, कधी शिक्षा म्हणून, कधी दमन करायचे म्हणून तर कधी रीती-रिवाज म्हणून, केवळ स्त्री म्हणून बलात्कार, विनयभंग, हुंडाबळी, स्त्रीभ्रूणहत्या होत राहतात. घराण्याची तथाकथित प्रतिष्ठा, जातिधर्माची चौकट ओलांडणार्‍यांना शिक्षा म्हणून ऑनरकिलिंगसारखे घातक प्रकार घडतात.

या भेदाच्या भिंती गळून पडाव्यात, स्त्री म्हणून जगण्याची भीती समूळ नष्ट व्हावी, यासाठी मूलभूत उपचार गरजेचे आहेत. ते करण्यासाठी महिलादिनाचे औचित्य मोठे आहे. या दिनानिमित्त अनेक अभिनव उपक्रम राबविले जातात. त्यात पुरुषांनीही सहभागी व्हावे. स्त्रीच्या अस्तित्वाची जाण त्यांनाही उमगू द्यावी. नाही तर महिलादिन म्हणजे महिलांनी महिलांसाठी साजरा करण्याचा एक दिवस, असा गैरसमज दृढ होईल. पुरुषांचा महिलांविषयक दृष्टिकोन पूर्वग्रहमुक्त होण्यासाठी, या दिनाचा प्रभावी वापर करून घ्यायला हवा. महिला म्हणजे उपभोग्य वस्तू, चेष्टा-विनोदाचे माध्यम हाच समज रूढ होतो, की काय अशी भीती वाटायला लागलीय. कारण, मोबाईलच्या माध्यमातून एसएमएस, एमएमएस, व्हॉटस् ऍपद्वारे शेअर केल्या जाणार्‍या विनोदांमध्ये महिलांवरील विनोदांचे, अश्‍लील क्लिपिंग्जचे प्रमाण सर्वाधिक असते. यातून महिलांविषयक मानसिकता दिसून येते. महिला हे करमणुकीचे साधन आहे का, याचा आपण सर्वांनी विचार करण्याची गरज आहे.
स्त्रियांना समानतेचे स्थान मिळण्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरातून सुरुवात करण्याची गरज आहे. छोटे छोटे उपाय सुरू केले, तरी खूप मोठा फरक पडेल. अपत्यजन्माचे विज्ञान आबालवृद्धांपर्यंत पोहचवले जावे. अपत्याचे मुलगा किंवा मुलगी असणे आई नव्हे तर पित्यावर अवलंबून असते, हे जीवशास्त्रीय सत्य सर्वदूर पोहोचवण्यासाठी उपक्रम राबवले जावेत. महिलांविषयक कायदे समजून घ्यावेत-समजून द्यावेत. मुलगा किंवा मुलगी हा भेद घरातही करू नये. मुलांचे चारित्र्यही मुलींच्या चारित्र्याइतकेच स्वच्छ असणे गरजेचे असल्याचा संस्कार त्यांच्यावर घरा-घरांतून व्हावा. मुलींसह मुलांनाही घरकाम शिकवावे. स्वयंपाक, कपडे-भांडी धुणे शिकवावे. स्वावलंबनाचे हे धडे सर्वांनी गिरवल्यास स्त्री-पुरूष समानतेला मोठाच हातभार लागेल. महिलांना सामाजिक न्याय मिळण्याची प्रक्रिया प्रदीर्घ आहे. सुरुवातीला एवढे केले तरी महिलादिनाचे सार्थक होईल, असे वाटते.




No comments:

Post a Comment