Monday 2 September 2013

 ऐरणीच्या देवा

उद्योगक्षेत्रात महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. आपल्या राज्यात मुंबई या
महत्त्वाच्या आर्थिक केंद्राचा समावेश आहे. त्यामुळे राज्याला औद्योगिक
क्षेत्रात आघाडी मिळायला मदत झाली. परंतु, पहिले मुख्यमंत्री यशवंतराव
चव्हाण यांच्या दूरदृष्टीला व त्यांनी निर्माण केलेल्या पोषक वातावरणाला
राज्याच्या औद्योगिक आघाडीचे खरे श्रेय जाते. चव्हाणसाहेबांनी संयुक्त
महाराष्ट्राचा मंगलकलश आणल्यानंतर १९६० साली राज्याची निर्मिती झाली.
सुरुवातीला काही वर्षे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. चीन
युद्धानंतर त्यांच्यावर राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात
आली. त्यामुळे ते दिल्लीला राष्ट्रीय राजकारणात गेले. तरीही
महाराष्ट्राच्या राजकारणाला, अर्थकारणाला व समाजकारणाला त्यांचे
मार्गदर्शन लाभले. सहकार क्षेत्राचा विकास करण्यात त्यांचा महत्त्वाचा
वाटा आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात उद्योगक्षेत्राचा विकास होण्यासाठी
पोषक वातावरण व पायाभूत सुविधा निर्माण होण्यासही त्यांचेच मार्गदर्शन व
नेतृत्व कारणीभूत ठरले.

चव्हाणसाहेबांच्या मदतीने ज्यांनी महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासात
मोलाची कामगिरी केली त्यांच्यामध्ये निळकंठराव कल्याणी यांचा समावेश
होतो. निळकंठरावांनी भारत फोर्ज या कंपनीची स्थापना केली व वर्षानुवर्षे
खपून तिचा विस्तार केला. आज भारत फोर्ज ही फोर्जिंगच्या क्षेत्रातील
जागतिक पातळीवरील बलाढ्य कंपनी आहे. धाडस व कठोर परिश्रम या गुणांच्या
आधारे त्यांनी वैयक्तिक पातळीवर श्रीमंती संपादन केलीच पण त्यासोबत
आपल्या कंपनीच्या रुपाने मोठ्या प्रमाणात रोजगार व संपत्तीची निर्मिती
केली. योगायोग असा की, चव्हाणसाहेबांच्या कराड शहराजवळ असलेले कोळे हे
निळकंठरावांचे मूळ गाव.

वृद्धापकाळामुळे निळकंठरावांचे नुकतेच निधन झाले. त्यांना मनोमन
श्रद्धांजली वाहताना विसाव्या शतकात महाराष्ट्राची देशातील आघाडीचे राज्य
म्हणून पायाभरणी करणार्‍यांची कामगिरी जाणवली.

व्यापार उद्योगात महाराष्ट्राचे आजचे आघाडीचे स्थान हे आपोआप निर्माण
झालेले नाही. बहुतांश राज्यात वारंवार पडणारा दुष्काळ आणि पाण्याचे
दुर्भिक्ष्य या समस्या घेऊनच महाराष्ट्राची निर्मिती झाली होती. या
'दगडांच्या देशा'त कल्पक नेतृत्व आणि व्यावसायिक धडाडीचा दुष्काळ मात्र
कधी नव्हता. त्यामुळेच यशवंतराव चव्हाण आणि निळकंठराव कल्याणी
यांच्यासारख्या मोठ्या माणसांच्या कामगिरीतून महाराष्ट्राने आधुनिक
उद्योगांमध्ये देशात आघाडी मिळवली. या क्षेत्रात आता राज्याने एवढे भक्कम
पाय रोवले आहेत की, हे सर्व काही स्वाभाविक वाटते आणि हे स्थान मोठ्या
हिकमतीने व कष्टाने मिळवले आहे, याची जाणीव होत नाही.

शेती आणि शेतीशी संबंधित व्यापार हा निळकंठरावांच्या घराण्याचा मुख्य
व्यवसाय होता. त्यांचे वडील गूळ, हळद व शेंगदाण्याच्या व्यवसायामध्ये
होते. त्यामुळे त्यांना घरीच व्यवसायाची ओळख झाली होती. पुण्यातील
महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण घेतले. त्यानंतर स्वत:चा व्यवसाय सुरू
करायच्या वेळी त्यांनी धाडस करून फोर्जिंगच्या क्षेत्रात पाऊल टाकले.
त्यांना त्यावेळी किर्लोस्कर उद्योगसमुहातील शंतनुराव किर्लोस्कर यांच्या
मार्गदर्शनाचा लाभ झाला. किर्लोस्कर हे महाराष्ट्राच्या औद्योगिकरणात
महत्त्वाची कामगिरी करणारे आणखी एक घराणे आहे.

महाराष्ट्र राज्याची निर्मिती १९६० साली झाल्यानंतर निळकंठरावांनी अवघ्या
एक वर्षात १९६१ साली भारत फोर्जची स्थापना केली. आज ही कंपनी
फोर्जिंगच्या क्षेत्रात जगातील सर्वांत मोठी कंपनी आहे. भारत फोर्जचा
विकास आणि महाराष्ट्राचे औद्योगिकरण यांची वाटचाल समांतर आहे. शेती व
संबंधित व्यापाराची पार्श्वभूमी असताना औद्योगिक क्षेत्रातील व्यवसायात
उडी मारण्याचे निळकंठरावांचे धाडस विशेष आहे. आपल्या राज्यात शेतीच्या
विकासाला व त्यातून मिळणार्‍या रोजगाराला नैसर्गिक मर्यादा आहे. व्यापार
उद्योगात प्रगती झाल्याखेरीज राज्याच्या विकासाला वेग येणार नाही, हे
ओळखून चव्हाणसाहेबांनी त्याला चालना दिली. निळकंठरावांसारख्या धडाडीच्या
उद्योगपतींनी कर्तबगारी बजावल्यामुळे राज्याला औद्योगिक क्षेत्रात आघाडी
मिळाली.

उद्योगाच्या क्षेत्रात केवळ धडाडी असून पुरत नाही. बुद्धिमत्ता, परीश्रम
आणि हाती घेतलेले काम उत्तमपणे तडीस नेण्याची जिद्द हे या क्षेत्रात
यशासाठी आवश्यक गुण असतात. निळकंठरावांना बुद्धिमत्तेची देणगी लाभली
होती. पाचगणीच्या शाळेत शिकताना ते मॅट्रिकच्या परीक्षेत मेरिट
लिस्टमध्ये चमकले होते. हाती घेतलेले काम झोकून देऊन करण्याची त्यांची
वृत्ती होती. त्यामुळे बारा वर्षे राज्याच्या सहकारी भूविकास बँकेचे
अध्यक्षपद भूषवताना त्यांनी शेतकर्‍याला शेतीच्या विकासासाठी कर्जपुरवठा
मिळवून देण्यात मोलाची कामगिरी केली. पुण्याच्या मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे
१९९० -९२ या काळात अध्यक्षपद भूषवताना त्यांनी संस्थेला उद्योग, शेती आणि
व्यापाराच्या क्षेत्रात नवी दिशा दिली. जिनेव्हास्थित वर्ल्ड इकॉनॉमिक
फोरमच्या सल्लागार मंडळाचेही ते सदस्य होते. त्यांनी जपानच्या शार्प
कंपनीसारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील बड्या कंपनीशी कोलॅबरेशन केले.

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून आणि बहुजन समाजातून आलेल्या या असामान्य
उद्योगपतीची दृष्टी विशाल होती. त्यांनी फोर्जिंगच्या क्षेत्रात सुरू
केलेली कंपनी जगातील सर्वात मोठी कंपनी झाली. लोखंड तापवून त्यावर घणाचे
घाव घालत फोर्जिंगचे काम चालते. आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे या कामातील
पद्धती बदलल्या असल्या तरी मुळात हे काम ऐरणीच्या देवाला ठिणगी - ठिणगी
वाहण्याचेच आहे. तापल्या लोखंडाप्रमाणे असलेल्या प्रतिकूल परिस्थितीची धग
सोसून आपल्या उद्दिष्टाकडे ठाम वाटचाल करणार्‍यांना अखेर यश मिळतेच. तसे
ते निळकंठरावांना मिळाले. त्यांच्या यशासोबत महाराष्ट्राचेही औद्योगिक
विकासात पुढचे पाऊल पडले. पण त्यासाठी त्यांनी अनेक ठिणग्या वाहिल्या
होत्या.

निळकंठराव कल्याणी यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन औद्योगिक
क्षेत्रातील महाराष्ट्राची आघाडी टिकवण्यासाठी सर्वांनी हातभार लावणे ही
त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

No comments:

Post a Comment