| अनुसया महिला सहकारी पतसंस्थेचे उदघाटन करताना अनुसया दत्तात्रेय वळसे पाटील |
मुलगा आणि मुलीला समान न्याय द्यायला हवा. मुलीला जगण्याचा हक्क व समानतेचा हक्क मिळाला पाहिजे. तरच देशाच्या प्रगतीला हातभार लागेल. समाजात महिलांचे प्रमाण पन्नास टक्के असल्याने, त्यांना भेदभावाची वागणूक देणे चुकीचे आहे. महिलांना समाजात बरोबरीचे स्थान न दिल्यास भारत जागतिक महासत्ता होऊ शकणार नाही.
मुलगा- मुलगी, गरीब-श्रीमंतांमधील दरी दूर करण्याचे काम करण्याची गरज आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जरी स्त्रियांना पन्नास टक्के आरक्षण असले, तरी त्यांना समानतेची वागणूक मिळण्यासाठी समाजाची मानसिकता बदलायला हवी. एकाच घरातील मुलगा आणि मुलीचे संगोपन समान पद्धतीने होत नाही. मुलाला चांगले शिक्षण दिले जाते, तर मुलीला त्यापासून वंचित ठेवले जाते. मुलीच्या लग्नात हुंडा द्यावा लागतो, ती घराण्याचे नाव लावत नाही अशा कारणांनी मुलीबाबत दुजाभाव केला जातो. स्त्रीभ्रुणहत्येसारखे घृणास्पद प्रकार घडतात.
महिलांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी मंचर परिसरात आम्ही प्रयत्न सुरू केले. महिलांना विश्वास वाटावा, न्याय मिळावा यासाठी तीन वर्षांपूर्वी अनुसया महिला उन्नती केंद्राची स्थापना करण्यात आली. या केंद्राशी आंबेगाव-शिरूर परिसरातील १६०० बचतगटांतील सुमारे सोळा हजार महिला जोडल्या गेल्या आहेत. आपल्या पायावर उभे राहण्याचा विश्वास महिलांमध्ये निर्माण करण्यात अनुसया महिला उन्नती केंद्र यशस्वी झाले आहे. या केंद्रातर्फे आगामी काळात आंबेगाव-शिरूर मतदारसंघातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. उद्योग, व्यवसायाचे मार्गदर्शन, प्रकल्प अहवाल व बँकांकडून अर्थसाह्य मिळवून देण्याचे काम केले जात आहे. निराधार व परित्यक्ता महिलांसाठीही असलेल्या वैयक्तिक लाभाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे. महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठी अनुसया केंद्रातर्फे स्वतंत्र कार्यक्रम तयार करण्यात येणार आहे. महिलांनी स्वावलंबी होण्याचा दृढनिश्चय करावा. व्यक्तिगत जीवनात अनेक छोटे-मोठे प्रश्न असून, ते सोडविण्याची अपेक्षा सर्वांना असते. त्याच्यासाठीही नजीकच्या काळात या केंद्रातर्फे योजना हाती घेतल्या जातील. महिलांना सामाजिक न्याय मिळवून देण्याच्या भूमिकेबरोबरच त्यांच्यासाठी आर्थिक न्याय प्रस्थापित करावा लागेल.
अन् महिलांना आर्थिक न्याय देण्याच्या दिशेने आम्ही एक पाऊल नुकतेच उचलले. मंचर येथे अनुसया पतसंस्थेची स्थापना करण्यात आली. राजकारण, तसेच पुरुषांच्या हस्तक्षेपापासून ही पतसंस्था अलिप्त ठेवली जाईल. आंबेगाव परिसरात महिला बचतगटांची चळवळ चांगलीच रुजली आहे. या बचतगटांना राष्ट्रीयीकृत बँका आणि खासगी क्षेत्रातील बँकांकडून मागणीनुसार कर्जपुरवठा मिळत नसल्याचे आढळल्याने खास महिलांसाठी पतसंस्थेची स्थापण्यात आली. मुलांचे शिक्षण, आजारपणात मदत तसेच व्यवसायासाठी महिलांना पतपुरवठा करण्याचे काम या पतसंस्थेतर्फे होणार आहे. आंबेगाव तालुक्यात तीन हजार २६८ बचतगट असून, त्यापैकी ६६८ गट दारिद्रयरेषेखाली आहे. तर २६०० बचतगट दारिद्रयरेषेवर आहेत. दारिद्रयरेषेखालील बचतगटांना सरकारी योजनांचा लाभ होतो. उर्वरित बचतगटांना पतसंस्थेतर्फे आर्थिक मदत करण्यात येईल. बचतगटांना कर्ज देताना अनुसया महिला उन्नती केंद्राची शिफारस घ्यावी लागेल. सभासदांचा आरोग्यविमा उतरविला जाईल.
महिला सबलीकरणाच्या चळवळीचा भाग म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण दिले गेले. त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेतच. त्याच प्रमाणे इतर क्षेत्रांतही ग्रामीण भागातील महिलाही आरक्षणाविना आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवित आहेत. अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील बाजारपेठेतील विविध व्यवसायांत महिलांनी वर्चस्व प्रस्थापित केले आहे. कुटुंब आणि व्यवसाय या दोन्ही आघाड्या या महिला समर्थपणे सांभाळत आहेत. व्यवसायाद्वारे हजारो रुपयांची उलाढाल करून या महिला कुटुंबाची आर्थिक प्रगती करत आहेत. अवसरी बुद्रुक ही मंचर तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठ आहे. या बाजारपेठेत विविध उत्पादनांची सुमारे ८० ते ९० दुकाने आहेत. त्यातील बहुतांश दुकाने महिला सांभाळत आहेत. या मोठ्या व्यवसायांसह लहान-सहान व्यवसायही महिला सांभाळत आहेत. महिला सबलीकरणाच्या दिशेने सकारात्मक वाटचाल होत असल्याची ही सुचिन्हे आहेत.
No comments:
Post a Comment