मंचरच्या विकासाची मानचिन्हे
वास्तविक पाहता आंबेगाव मंचर परिसर हा दुष्काळी भाग होता. १९९० मध्ये आंबेगाव-मंचर परिसराच्या लोकप्रतिनिधित्वाची जबाबदारी जनतेने जेव्हा माझ्यावर सोपवली तेव्हा पाणी प्रश्न मार्गी लावण्याचे ठरवले. पाणी हा शेतीचा आत्मा आहे. पाण्याशिवाय शेती व शेतीशिवाय शेतकरी जगू शकणार नाही, ही बाब समोर ठेवत त्यांनी प्रथम सिंचन जाळे प्रकल्प उभारण्याकडे विशेष लक्ष दिले. याचा पहिला टप्पा म्हणजे कुकडी प्रकल्पांतर्गत घोड नदीवर डिंभे धरणाची उभारणी केली.
फक्त धरणाने हा प्रश्न सुटणार नव्हता. त्यामुळे घोड नदीवर २० बंधारे व डिंभे धरणावर आठ बंधारे बांधले तसेच उपसा सिंचन योजनाही राबवल्या. यथावकाश या अवर्षणप्रवण भागाचा कायापालट होऊ लागला. तालुक्यात पावसाची सरासरी ८६० मिमी असली तरी पाऊस पडण्यात सातत्य नसल्यामुळे पिकांचे बरेच नुकसान होत असे. या अवर्षणप्रवण परिस्थितीचा सामना आपल्या गावातील शेतकर्यांना करता यावा या हेतूने परिसरात सिंचन प्रकल्पांचे जाळे उभारण्याचा संकल्प करून तो सिद्धीस नेला. आधी या भागात ज्वारी, बाजरी, मटकी, गहू, हरभरा यासारखी पिके घेतली जात असत. परंतु सिंचन योजनांमुळे ऊस, टॉमॅटो, बटाटा या नगदी पिकांबरोबरच आंबा, द्राक्ष, सीताफळ यासारख्या फळांचेही उत्पादन घेतले जाते. तसेच या सिंचन प्रकल्पामुळे शेतकर्यांना जरबेरा, कार्नेशीम व गुलाब यासारख्या फुलांचे उत्पादन घेणे शक्य होत आहे. शेतकर्यांच्या शेतात फुललेल्या या फुलांना आज परदेशातही मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.
पाणी प्रश्न सुटल्याने आपोआपच गावातील शेतीचा प्रश्न सुटला आणि त्याचबरोबर शेतीसोबतच्या दुग्धव्यवसाय, कुकुटपालन, रेशीम उद्योगांनाही चालना मिळाली. शेतीला पुरेसे असे पाणी मिळाल्याने जनावरांना मुबलक चारा मिळू लागला. त्यामुळे दुग्धव्यवसायात वाढ झाली. १९९० च्या सुमारास आंबेगाव तालुक्यत पाण़ी व चार्याअभावी जेमतेम १८ ते १९ हजार लिटर दुधाचे संकलन होत असे. परंतु सिंचन क्षेत्रात वाढ झाल्यामुळे जनावरांना मुबलक चारा मिळाल्यानेे येथील दुग्धव्यवसायही भरभराटीला आला आहे. आता सुमारे सहा लाख लिटर दुधाचे संकलन केले जाते.
नालंदा इंग्लिश मिडियम स्कूल
देशाची प्रगती ही शेतीवर जितकी अवलंबून असते तितकाच तो शिक्षणावरही अवलंबून असतो. ग्रामीण भागातील प्रत्येक मुला-मुलीला उत्तम प्रकारचे इंग्रजी माध्यमातील शिक्षण मिळावे यासाठी नालंदा इंग्लिश स्कूलची सुरवात करण्यात आली. नालंदा इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये नर्सरीपासून दहावीपर्यंत शिक्षण दिले जाते. मराठी, हिंदी, इंग्रजीसह संस्कृत व फ्रेंच या भाषेचेही शिक्षण दिले जाते. अद्ययावत अशा या शाळेत डिजिटल स्वरुपाचे वर्ग मुलांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अभ्यासाप्रमाणे मुलांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करत योगा, मल्लखांब, नृत्य, नाटक, फुटबॉल, स्केटिंग, कराटे अशा विविध खेळांचेही प्रशिक्षण शाळेत दिले जाते. तसेच दिवाळी, गणेशोत्सवासारखे सण साजरे करून मुलांना भारतीय संस्कृतीबद्दलही माहिती देण्याचे काम शाळेतील प्रशिक्षित शिक्षकांकडून केले जाते. भविष्यकाळात येथे कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्याचा मानस आहे.
अवसरी अभियांत्रिकी महाविद्यालय
मंचर ग्रामीण रुग्णालय
भीमाशंकर साखर कारखाना
गोवर्धन डेअरी प्रकल्प
मंचरचे नाव जागतिक स्तरावर पोहचविले आहे ते तेथील गोवर्धन डेअरी प्रकल्पानं. दही, दूध, ताक अशा दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीपेक्षा चीज, बटर अशा आधुनिक पदार्थांच्या निर्मितीचे धाडस पराग मिल्क प्रॉडक्टसच्या देवेंद्र शहा यांनी केले, आणि त्यातूनच साकारला गोवर्धन डेअरी प्रकल्प. या प्रकल्पामुळे सुमारे सव्वा लाख शेतकर्यांना रोजगार उपलब्ध झाला आहे. या डेअरीचं वेगळेपण असं, की या डेअरीत तीन हजारपेक्षा जास्त गाई असलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे काऊ मिल्क फार्म तयार करण्यात आले आहे. या फार्ममध्ये गायींची तज्ञांच्या देखरेखीखाली योग्य निगा राखली जाते. उत्तम दर्जाचे दूध मिळावे यासाठी या गायींना वेळोवेळी सकस आहार दिला जातो. दिवसातून तीनदा त्यांना मिल्किंग विभागात नेले जाते व संपूर्ण यांत्रिकरित्या या विभागात गाईंचे दूध काढले जाते.
गो चीज प्रकल्प
गोवर्धन डेअरी प्रकल्प उभा करुन जसे आंबेगाव मंचरला एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. त्याप्रमाणेच या डेअरीने गो चीजसारख्या उच्च दर्जाच्या चीजचे उत्पादन करून शहा यांनी आशियात महाराष्ट्राचे नाव एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. आशियातील सर्वांत मोठा चीज प्रकल्प म्हणून गो चीज प्रकल्पाकडे पाहिले जाते. डेअरीत बनणार्या श्रीखंड, दही, पेढे या पदार्थांप्रमाणेच येथे बनणार्या बटर, चीजला भारताप्रमाणे भारताबाहेरही मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. हे चीज बनविताना वापरण्यात येणार्या युएचटी (अल्ट्रा व्हायरस टेम्परेचर) तंत्रज्ञानामुळे सामान्य वातावरणातही हे चीज सहा महिन्यांपर्यत टिकू शकते. या प्रकल्पासाठी वापरण्यात आलेल्या अद्ययावत तंत्रज्ञान व कंपनीची उत्पादन गुणवत्ता लक्षात घेत न्युझीलंडने आयएसओ प्रमाणपत्र देऊन गोवर्धनला प्रमाणित केले आहे.


